Soil : दरवर्षी ५ डिसेंबर हा दिवस जगभरात “जागतिक मृदा दिवस” म्हणून साजरा केला जातो. मातीचे आरोग्य, तिची सुपीकता, जैविक विविधता आणि शाश्वत कृषी उत्पादनक्षमता यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. या वर्षीचा विषय “निरोगी शहरांसाठी निरोगी माती” आहे. यामागील उद्देश शहरी पर्यावरणाचे आरोग्य आणि मातीच्या आरोग्याशी असलेले नाते लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. मातीचे संरक्षण, प्रदूषणमुक्ती, हरितक्षेत्रांचा विकास आणि पर्यावरणपूरक व्यवस्थापन यांना प्रोत्साहन देऊन शहरांना अधिक सुदृढ, सुरक्षित आणि शाश्वत बनवणे आवश्यक आहे.
जागतिक मृदा दिवसाची निर्मिती
जागतिक मृदा दिवस साजरा करण्यामागे संयुक्त राष्ट्रांच्या खाद्य व कृषी संघटनेचा (FAO) मोठा सहभाग आहे. २००२ मध्ये आंतरराष्ट्रीय मृदा विज्ञान संघटनेने या दिवसाचा प्रस्ताव मांडला, आणि २०१३ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी त्यास अधिकृत मान्यता दिल्यानंतर २०१४ पासून तो जगभर साजरा होऊ लागला.
या दिवसाचा मुख्य उद्देशः
- मातीच्या ऱ्हासाकडे जागतिक लक्ष वेधणे
- शाश्वत कृषी आणि पर्यावरणीय समतोल यांचा प्रसार करणे
- मातीची सुपीकता वाढवण्यासाठी शास्त्रीय उपाय आणि लोकसहभागाला प्रोत्साहन देणे
- हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर माती संरक्षणाची गरज अधोरेखित करणे
मातीचे महत्त्व
माती ही एक जिवंत परिसंस्था आहे. तिच्यातील सूक्ष्मजीव, सजीव घटक आणि पोषकद्रव्ये पर्यावरणाच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. निरोगी माती म्हणजे:
- अन्नद्रव्यांचे संतुलन
- सेंद्रिय पदार्थांची मुबलकता
- पाण्याचा योग्य निचरा
- प्रदूषणमुक्तता
- समृद्ध जैवविविधता
जर माती निरोगी असेल तर पिकेही पौष्टिक आणि निरोगी वाढतात, पाण्याची शोषण क्षमता वाढते आणि हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी होतात.
शहरीकरण आणि मातीची समस्या
जगभरातील शहरीकरणामुळे मातीवर दबाव वाढला आहे. जगातील ५५% पेक्षा अधिक लोक शहरांमध्ये राहतात. शहरांचा विस्तार होताना:
- मातीवर अतिक्रमण
- काँक्रीटीकरण आणि बांधकामाचे अवशेष
- प्रदूषण (प्लास्टिक, रसायने)
यामुळे मृदा प्रदूषण, पाण्याचा अभाव, जैवविविधतेचा ऱ्हास आणि हरितक्षेत्र कमी होत आहे. याचा अंतिम परिणाम मानवी आरोग्यावर गंभीर आणि विपरीत होतो.
हवामान बदल आणि माती
माती ही पृथ्वीवरील सर्वात मोठा कार्बन सिंक आहे. निरोगी माती वातावरणातील कार्बन शोषून घेतल्याने ग्रीनहाऊस वायूंचे प्रमाण कमी होते. शहरांमध्ये झाडे आणि माती टिकवली गेल्यास हवामान बदलाशी लढण्याचे सर्वोत्तम साधन ठरते. महाराष्ट्रात गेल्या काही दशकांपासून मातीचा ऱ्हास गंभीर विषय बनला आहे. कारण:
- हवामान बदल
- पाण्याची टंचाई किंवा पाण्याचा अतिवापर
- रासायनिक खतांचा असंतुलित वापर
- जमिनीतील सेंद्रिय कर्ब कमी होणे
यामुळे मातीची सुपीकता, उत्पादनक्षमता आणि निचरा क्षमता कमी झाली आहे.
मातीच्या आरोग्याचा पीक उत्पादनावर परिणाम
- सुपीक थर नष्ट होणे → पोषकद्रव्यांची कमतरता
- सुपीकतेत घट → उत्पादनक्षमता कमी
- पाणी धारणक्षमता कमी → दुष्काळ संवेदनशीलता वाढणे
- मुळांची वाढ अडथळलेली → पोषकद्रव्यांचे शोषण कमी
- उगवण कमी → तापमानातील चढउतार जास्त
- रासायनिक खतांवर अवलंबित्व वाढ
- उत्पादन आणि गुणवत्ता घट → ३०–५० % कमी होण्याची शक्यता
रासायनिक खतांचा दुष्परिणाम
रासायनिक खत आणि कीटकनाशकांचा जास्त वापर अन्नामधून मानवाच्या शरीरात प्रवेश करतो. त्याचे परिणाम:
- पोटदुखी, उलटी, अपचन
- यकृत आणि मूत्रपिंडावर परिणाम
- स्मरणशक्ती कमी, डोकेदुखी, न्युरोलॉजिकल आजार
- प्रजनन क्षमता कमी, जन्मजात दोष
- दीर्घकालीन संपर्क → कर्करोग किंवा गंभीर आजार
माती संवर्धनासाठी उपाय
- सेंद्रिय शेती: कंपोस्ट, जैविक खतांचा वापर
- पर्यावरणपूरक कीटकनाशके
- पिकांची योग्य फेरपालट
- शाश्वत शेती पद्धती
- प्लास्टिक वापर कमी करणे
- झाडे लावणे, हरितक्षेत्र वाढवणे
- घरच्या घरी किचन गार्डन, टेरेस गार्डन, बाल्कनी गार्डन
- डॉ. समाधान सुरवसे, डॉ. अभिनंदन पाटील आणि डॉ. अशोक कडलग
(वसंतदादा शुगर इन्टिट्यूट, मांजरी बु. पुणे)
