पुणे : महिलांच्या स्वयंसहाय्यता समूहांनी तयार केलेल्या वस्तू व उत्पादनांना हक्काची तसेच कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी राज्यात 'उमेद मॉल' सुरू होणार आहेत.
हे मॉल प्रायोगिक तत्त्वावर राज्यातील पुणे, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, सातारा, लातूर, नांदेड, ठाणे या १३ जिल्ह्यांमध्ये सुरू होणार आहे.
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन झालेल्या समूहांना त्यात प्राधान्य असेल. ग्रामीण भागातील महिलांच्या उत्पादनांना शहरी ग्राहकांपर्यंत पोहोचविणे.
तसेच मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी करणे आणि महिलांचे उत्पन्न वाढवणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. हे उमेद मॉल शहरात, जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी उभारले जाणार आहेत.
महिला उत्पादनांना थेट विक्रीसाठी कायमस्वरूपी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणे, ग्रामीण महिलांना उद्योजकतेसाठी प्रवृत्त करणे, स्थानिक, पारंपरिक व नैसर्गिक उत्पादनांचा ब्रँड म्हणून महिलांचे उत्पन्न वाढविणे.
तसेच स्वावलंबन व सामाजिक दर्जा वाढवणे ही या मॉल'ची मुख्य उद्दिष्टे आहेत. ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता समुहाकडे या उमेद मॉलचे व्यवस्थापन असणार आहे.
या जिल्ह्यांची निवड का?
◼️ महिला स्वयंसहाय्यता समूहांची संख्या व सक्रियता जास्त या जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणावर महिला स्वयंसहाय्यता समूह स्थापन झालेले आहेत.
◼️ हे समूह उत्पादन, बचत गट व्यवहार, उद्योजकता व विपणन क्षेत्रात सक्रिय सहभाग घेत असल्यामुळे त्यांच्या उत्पादनांना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध करून देणे व्यवहार्य ठरते.
◼️ यासाठी निवडलेले जिल्हे हे महत्त्वाची शहरे, पर्यटनस्थळे व व्यापारी केंद्रे असल्याने येथे खरेदी क्षमता असलेला ग्राहकवर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे ग्रामीण महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना स्थिर व नियमित मागणी निर्माण होण्यास मदत होते.
सुविधा तुलनेने चांगल्या मिळणार
◼️ या जिल्ह्यांमध्ये रस्ते, रेल्वे, वाहतूक व्यवस्था, गोदामे, बाजारपेठा व विपणन साखळी तुलनेने विकसित आहे.
◼️ त्यामुळे उत्पादनांची साठवणूक, वाहतूक, वितरण व विक्री कार्यक्षमतेने करता येते आणि महिलांच्या उत्पादनांना मोठ्या बाजारपेठेत पोहोचवणे सुलभ होते.
◼️ महिला स्वयंसहाय्यता समूहांचे मजबूत जाळे, शहरी बाजारपेठ, उत्पादनांची विविधता आणि उत्तम दळणवळण सुविधा या कारणांमुळे पहिल्या टप्प्यात या जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे.
अधिक वाचा: शेत पाणंद रस्ते दिसणार आता ऑनलाईन; योजना राबवण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांना मिळाले विशेष अधिकार
