रऊफ शेख
फुलंब्री : आत्मविश्वास, प्रचंड मेहनत करण्याची तयारी, चिकाटी, जिद्द, प्रामाणिकपणा हे गुण अंगी असतील तर शेती (Farming) व्यवसायात पुरुषच काय महिला(Women) देखील लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू शकतात. ही कर्तबगारी १० बचत गटांच्या महिलांनी सिद्ध करून दाखविली आहे.
फुलंब्री तालुक्यातील शिरोडी खुर्द परिसरात महिलांनी शंभर एकर क्षेत्रात फुलशेती फुलविली(Cultivate Flowers) असून, त्यातून त्या वर्षाकाठी दोन ते अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न (Income)मिळवित आहेत.
फुलंब्री शहरापासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर शिरोडी खुर्द गाव आहे. या गावात पाच वर्षांपूर्वी केवळ एका शेतकऱ्याने झेंडूची फुले लावून फुलशेतीला सुरुवात केली होती.
मात्र, त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने आणि आम्रपाली साधन केंद्राचे तालुका समन्वयक संदीप नांदवे, लेखापाल पंडित भोकरे यांच्या मदतीने १० बचत गटांच्या ६० महिलांनी विविध बँकांकडून कर्ज घेऊन फुलांची शेती करण्याचा निर्णय घेतला.
येथे होते फुलांची विक्री
प्रत्येक महिलेने आपल्या शेतात शेवंती, बिजली, झेंडूच्या फुलांच्या रोपट्यांची लागवड केली. चार महिन्यांत फुले तोडणीस येत असून, फुलांची विक्री छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक येथील बाजारात करून महिला लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत. या गावात जवळपास शंभर एकर क्षेत्रात या महिलांनी फुलशेती फुलविली असून, यातून त्यांना वर्षाकाठी खर्च वजा जाता दोन ते अडीच कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.
यामुळे अनेक कुटुंबांचा यातून उदरनिर्वाह होत आहे. यातून वर्षभर उत्पन्न मिळत असून, कमी जागेत जास्त उत्पन्न मिळवून हा देणार हा व्यवसाय आहे.
शिरोडी खु. येथील बचत गटांच्या महिलांनी सुरु केलेल्या फुलशेती व्यवसायामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. या फुलांची विक्री विदेशात करून महिलांना जास्तीचे पैसे मिळवून देण्यासाठी आम्ही उपाययोजना करत आहोत. - चंदनसिंग राठोड, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ
२०२३ मध्ये मी केवळ १५ गुंठे क्षेत्रात फुलशेती व्यवसाय सुरू केला. फुलाला बाजारात समाधानकारक भाव मिळाल्याने मला अडीच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यंदा मी फुलशेतीचे क्षेत्र वाढविले आहे. - रोहिणी पंडित भोकरे, सदस्य, दुर्गामाता महिला बचत गट