हिवाळ्यातील हवा थंड आणि कोरडी असल्याने नागरिकांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होत आहे. त्यामुळे श्वसनविकारांसह विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
हिवाळ्यात दिवस छोटा आणि रात्र मोठी असते. त्यामुळे नागरिकांचा सूर्यप्रकाशात राहण्याचा वेळ कमी झालेला असतो. वातावरण थंड असते. त्यातून शरीरातील 'ड' जीवनसत्वाची पातळी कमी झालेली असते. त्यामुळे प्रतिकारशक्ती कमकुवत होते.
थंडी वाढल्यावर नागरिक अधिक काळ घरामध्येच थांबतात. परिणामी घरातील सदस्यांमध्ये जंतूसंसर्ग वेगाने पसरण्याचा धोका असतो. यामुळे ताप, सांधेदुखी, सर्दी पडसे अशा तक्रारी सुरू होतात.
या तक्रारी टाळण्यासाठी बदलत्या हवामानानुसार आहार आणि जीवनशैलीत बदल करणे अत्यंत आवश्यक असते, असे आरोग्यतज्ज्ञांनी सांगितले आहे.
कोणाला अधिक धोका?■ थंडीत दम्यासह श्वसनविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांना अधिक त्रास होण्याचा धोका असतो. त्यामुळे त्यांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे अपेक्षित आहे. अन्यथा आरोग्य अधिक बिघडू शकते.■ अचानक तापमान कमी झाल्यामुळे हे वातावरण विषाणूंच्या वाढीला पोषक ठरत असते. त्यामुळे या कालावधीत विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत असते.
ही खबरदारी आवश्यक■ सध्या थंडीचा ऋतू आहे आणि पुन्हा सर्दी, ताप, खोकला, कफाचे आजार, अॅलर्जी यामुळे होणारी सर्दी, दमा यांचे रुग्ण वाढत आहेत.■ थंडीत भूक वाढते असे ऐकून, वाचून या ऋतूत काहीही खा, असे करून चालत नाही.■ कफाचा त्रास असल्यास तसेच फार श्रम अथवा व्यायाम नियमित नसेल तर पालेभाज्या, दही, अतिप्रमाणात रसदार फळे विशेषतः सकाळच्या वेळी खाणे टाळावे.■ भरपूर पाणी पिणे टाळावे, जेवणानंतर भरपूर पाणी पिऊ नये. आहारात सुंठ, जिरे, मिरे, लसूण, हिंग यांचा समावेश करावा.
याकडे दुर्लक्ष नको?१) सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास.२) दमा, अॅलर्जी आणि श्वसनविकार.३) सांधेदुखी, आर्थराइटिसचा त्रास.४) रक्तवाहिन्यांचे आकुंचन, रक्तदाब वाढ.५) उन्ह कमी अंगावर घेतल्याने 'ड' जीवनसत्वाची कमतरता.
काय काळजी घ्याल?१) थंडी असली तरी व्यायाम सुरू ठेवा.२) किमान सूर्यनमस्कार करणे आवश्यक.३) थंडीपासून बचावासाठी उबदार कपडे वापरा.४) शक्यतो 'एसी'चा वापर टाळा.५) सूर्यप्रकाशात अधिक वेळ थांबा.६) त्रास होत असेल तर डॉक्टरांना दाखवा.