भीमानगर : सोलापूर जिल्ह्यातील २०२५-२६ चा ऊस गाळप हंगाम संपून जवळपास तीन महिने उलटून गेले असतानाही शेतकऱ्यांची तब्बल २१७ कोटी ४८ लाख रुपयांची एफआरपी अद्याप थकीत असल्याची बाब समोर आली आहे.
याबाबत ऊस दर नियंत्रण समिती सदस्य प्रा. सुहास पाटील यांनी मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत मुख्य सचिव राजेश कुमार अग्रवाल यांच्या निदर्शनास हा विषय आणून देत निवेदन सादर केले.
मुंबई येथे मंत्रालयात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस दर नियंत्रण मंडळाच्या बैठकीत राज्यातील जिल्हानिहाय ऊस गाळप हंगाम, साखर उतारा आणि एफआरपी स्थितीचा आढावा घेण्यात आला.
यावेळी प्रा. सुहास पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात थकीत असलेली एफआरपी मांडत कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदनानुसार, ३६ साखर कारखान्यांपैकी तब्बल २३ कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांना उसाची एफआरपी पूर्णपणे अदा केलेली नाही.
यामध्ये सर्वाधिक थकबाकी विठ्ठल साखर कारखाना या कारखान्याकडे असून तब्बल ५८ कोटी ५७ लाख रुपये थकीत आहेत.
हा कारखाना माढा मतदारसंघाचे आमदार तथा विठ्ठल कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहे.
लोकनेते बाबूराव पाटील साखर कारखाना कडे ३९ कोटी ४२ लाख, कमला भवानी साखर कारखाना कडे ३६ कोटी ९० लाख रुपयांची एफआरपी थकीत आहे.
भीमा सहकारी साखर कारखाना कडे ३० कोटी ३६ लाख, तसेच सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना कडे ३० कोटी ४४ लाख रुपयांची एफआरपी थकीत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
१५ टक्के व्याजासह रक्कम देणे आवश्यक
ऊस दर नियंत्रण कायदा १९६६ नुसार १४ दिवसांच्या आत एफआरपी अदा करणे बंधनकारक असून, विलंब झाल्यास १५ टक्के व्याजासह रक्कम देणे आवश्यक आहे. त्यामुळे थकीत एफआरपीसह व्याजाची रक्कम तत्काळ शेतकऱ्यांना मिळावी, अशी मागणी सुहास पाटील यांनी केली आहे.
चालू गाळप हंगामात कारखान्यांनी जाहीर केलेला दर आणि एफआरपी मिळून जवळपास ३६० कोटी रुपयांची थकबाकी आहे. शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवण्यासाठी लवकरच संघटित आंदोलन उभारण्यात येईल. - प्रा. सुहास पाटील, ऊस दर नियंत्रण समिती सदस्य
अधिक वाचा: १०० गोणी कांद्याला मिळाले १४०० रुपये; हतबल झालेल्या शेतकऱ्याने २ एकरातील कांदा दिला पेटवून
Web Summary : Solapur farmers await ₹217.48 crore in pending FRP payments from 23 sugar factories. Member Suhas Patil demanded action at a meeting, emphasizing the 15% interest owed under the law. Vitthal factory owes the most.
Web Summary : सोलापुर के किसानों को 23 चीनी मिलों से ₹217.48 करोड़ FRP भुगतान का इंतजार है। सदस्य सुहास पाटिल ने बैठक में कार्रवाई की मांग की, कानून के तहत देय 15% ब्याज पर जोर दिया। विट्ठल कारखाने पर सबसे अधिक बकाया है।