Join us

Wildlife and Farmers : अन्नाच्या शोधात वन्यजीव पिकावर मारतात ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 16:10 IST

Wildlife and Farmers : पश्चिम विदर्भात शेतीत पिकांवर आलेले भयानक संकट म्हणजे जंगली मोकाट जनावरांचा त्रास. पीक (Crop) पेरणीपासून ते सोंगणीपर्यंत सर्वच अवस्थेत पिकाला वेगवेगळ्या प्रकारे उद्ध्वस्त करण्यासाठी ही जनावरं सज्ज असतात. वाचा सविस्तर.

पश्चिम विदर्भातशेतीत पिकांवर आलेले भयानक संकट म्हणजे जंगली मोकाट जनावरांचा त्रास. पीक (Crop) पेरणीपासून ते सोंगणीपर्यंत सर्वच अवस्थेत पिकाला वेगवेगळ्या प्रकारे उद्ध्वस्त करण्यासाठी ही जनावरं सज्ज असतात.

शेती अन् शेतकरी (Farmer) म्हटलं की, आपल्या अंगावर काटा उभा राहतो. कारण शेतीत पीक काढण्यासाठी घ्यावे लागणारे काबाडकष्ट खूप भयंकर आहेत, पण त्यामानाने मिळकत खूप कमी आहे. खर्च जास्त होतो व उत्पादन कमी होते, शेती तोट्यात जात आहे, हे आपण सर्वजण चांगल्या पद्धतीने जाणून आहोत. सर्वांना ते ज्ञात आहे; पण लक्षात कोण घेतो?

अलीकडे आपल्या पश्चिम विदर्भात (Vidarbha) शेतीत पिकांवर आलेले भयानक संकट म्हणजे जंगली मोकाट जनावरांचा त्रास. हरणं, डुकरं, माकडं, तडस, रोही ही जंगली जनावरे खूप झाली आहेत.

पीक पेरणीपासून ते सोंगणीपर्यंत सर्वच अवस्थेत पिकाला वेगवेगळ्या प्रकारे उ‌द्ध्वस्त करण्यासाठी ही जनावरे सज्ज असतात तुम्ही तूर पेरली डुकरे त्याच रात्री जाऊन काकर उकरून तूर खाऊन टाकतात, अगदी तासानं तास घेऊन दहा-बारा डुकरं संपूर्ण शेत उकरून फस्त करून टाकतात. पुन्हा पेरली तर पुन्हा खातात, औषध लावून पेरली तरीही खातात, त्यांच्या तोंडातून जे सांडले, सुटले ते मग उगवते.

तुम्ही राखणाला जा, तिथं कुटार जाळून धूपट करा, हातात सोडगन घेऊन तोंडाने आरडाओरडा करा, ते डाव साधतात, हे नक्की,

ज्वारीचं शेत यांच्या खास आवडीचे. ज्वारीला डुकरे बिलकूल ठेवतच नाहीत, पूर्ण पीक बरबाद करतात. म्हणून हल्ली अकोला जिल्ह्यात तर ज्वारीचं पीक घेणं बऱ्याच भागात शेतकऱ्यांनी जवळजवळ बंद केले आहे. कपाशीत रोही उन्मत्तपणे हैदोस घालून पिकाची नासाडी करतात.

या जनावरांना मारता येत नाही म्हणतात, सरकारचा वन्यप्राणी कायदा नक्की कसा आहे, हेही शेतकऱ्यांना माहिती नाही. त्याची फारशी माहितीही सरकार शेतकऱ्यांना करून देत नाही.

शेतकऱ्यांना या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी खूप खर्च येतो. काही शेतकरी मग रब्बीत हरभरा पेरला की, शेताच्या चारही मेरींनी साड्या लावतात, बाजारात या साड्या कमी पैशांत विकत मिळतात, पण आता कमी पैशांत मिळत असल्या तरी त्या खूप मोठ्या प्रमाणात लागतात म्हणून खर्च जास्त होतो. दुसरा उपाय म्हणजे अवैध प्रकारे सेतात इलेक्ट्रिक करंट लावणे, पण हा प्रकार खूप जीवघेणा आहे.

अनेक शेतकरी या प्रकारात आपलाच जीव गमावून बसले आहेत. म्हणून आता त्याची सुधारित आवृत्ती म्हणजे धक्का मशीन आली आहे. ही धक्का मशीन बाजारात विकत मिळते. तिच्या साहाय्याने तारांमध्ये बॅटरीचा सौम्य करेट सोडला जातो.

जनावरांना त्याद्वारे हलका शॉकचा धक्का बसतो व जनावर दूर फेकले जाते.ते मरत नाही. माणसालापण धक्का बसतो प्राणहानी होत नाही. ही मशीन बरीच महाग येते, तसाच तार बांधणीचा खर्च येतो.

तिसरा उपाय म्हणजे दिवाळीतले सुतळी फटाके फोडणे, पण यासाठी प्रत्यक्ष शेतात रात्री जाऊन ते वेळोवेळी फोडावे लागतात.

चौथा उपाय म्हणजे छर्रा बंदूक विकत आणून फायर करणे. ही बंदूकसुद्धा खूप महाग येते; पण ती बघून माकडे वगैरे पळून जातात हे नक्की. काही ठिकाणी जनावरांच्या तोंडात फुटणारे फटाकेपण मिळतात. तोपण प्रकार महागडाच आहे.

कुत्री पाळणे, रखवाली ठेवणे, कुत्र्यांच्या आवाजात आरडाओरडा करणारे भोंगे आणून ते वाजवणे अशी नाना प्रकारची आयुधं, उपाय करून हल्ली शेतकरी आपले पीक कसंबसं वाचवतो आहे अन् पिकवतो आहे. पण, भविष्यात जंगली जनावरांची वाढती संख्या बधता शेतकरी त्यांच्या कचाट्यातून आपलं पीक वाचवू शकेल असे वाटत नाही.

मायबाप सरकारने या बाबीचा गंभीरपणे विचार करावा, असे शेतकऱ्यांना वाटते आहे. एखादी योजना नाही दिली तरी चालेल, कर्जमाफी केली नाही तरी चालेल, पण या जंगली मोकाट जनावरांचा बंदोबस्त सरकारने लवकरात लवकर करावा, युद्धपातळीवर करावा, एवढेच हात जोडून नम्र निवेदन सरकारला आहे. तूर्तास एवढेच बाकी काही सांगणे नाही. धन्यवाद.

- पुष्पराज गावंडे, बहिरखेड, ता. जि. अकोला

हे ही वाचा सविस्तर : swamitva yojana : स्वामित्व योजनेतून ५००० गावांत ड्रोनचे उड्डाण वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रवन्यजीवशेतकरीशेतीविदर्भ