आज सर्वांना आरोग्यदायी जीवनशैलीसाठी पोषक आहार घेणं गरजेचं झालं आहे. त्यामुळे खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये मोठे बदल होत आहेत.
दरम्यान बाजारात मिळणाऱ्या विविध खाद्यतेलांपैकी कोणते तेल आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे हा प्रश्न अनेकांना पडतो. यामध्ये मुख्यतः दोन प्रकारची तेलं पाहायला मिळतात. एक कोल्डप्रेस तेल आणि दुसरे म्हणजे रिफाइन्ड तेल.
कोल्डप्रेस तेल म्हणजे काय?
कोल्डप्रेस तेल हे पारंपरिक पद्धतीने कमी तापमानात तयार केलं जातं. यामध्ये कोणतेही रसायन वापरले जात नाही. बीया थेट दाबून तेल काढले जाते. ही प्रक्रिया करताना बियांमधील पोषकतत्त्व टिकून राहतात. यामुळे या तेलाला नैसर्गिक चव, रंग आणि गंध येतो. कोल्डप्रेस तेल हे अधिक शुद्ध, पौष्टिक आणि सेंद्रियतेजवळचं मानलं जातं.
रिफाइन्ड तेल म्हणजे काय?
रिफाइन्ड तेल तयार करताना बीया उष्णतेवर प्रक्रिया करून तेल काढलं जातं. यामध्ये अनेक रसायने वापरली जातात आणि तेल गाळून, वास, चव, रंग यावर प्रक्रिया केली जाते. त्यामुळे तेल शुद्ध दिसतं पण त्यातील नैसर्गिक पोषणमूल्य कमी होतं. रिफाइन्ड तेलात अनेक वेळा कृत्रिम अँटीऑक्सिडंट्स आणि रंग मिसळले जातात.
कोल्डप्रेस आणि रिफाइन्ड तेलातील पोषणमूल्यातील फरक
• अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वं - कोल्डप्रेस तेलात जीवनसत्त्व ई, ए आणि अँटीऑक्सिडंट्स नैसर्गिक स्वरूपात टिकून राहतात. रिफाइन्ड प्रक्रियेमुळे ही घटकं नष्ट होतात.
• ओमेगा फॅटी अॅसिड्स - कोल्डप्रेस तेलात ओमेगा-३ आणि ओमेगा-६ यांचे प्रमाण योग्य असते, जे हृदयासाठी लाभदायक ठरते. रिफाइन्ड तेलात तापमानामुळे हे फॅटी अॅसिड्स कमी होतात.
• गंध आणि रंग - कोल्डप्रेस तेलाला नैसर्गिक गंध आणि रंग असतो, जो अप्रत्यक्षपणे सेंद्रियतेचं लक्षण असतो. रिफाइन्ड तेल गंधरहित आणि रंगहीन असतं, कारण त्यावर प्रक्रिया होते.
• शरीरावर परिणाम - रिफाइन्ड तेलामधील रसायनं हृदयरोग, कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढवू शकतात. उलट कोल्डप्रेस तेल नैसर्गिक असल्याने शरीरावर कोणताही घातक परिणाम करत नाही.
• पचनास सुलभ - कोल्डप्रेस तेल पचनास हलकं असतं, त्यामुळे जठरास जलद पचतं. रिफाइन्ड तेल पचायला मात्र कठीण असतं.
हेही वाचा : तुमच्याही नारळाच्या झाडाला नारळ लागत नाही? जाणून घ्या कारणं आणि सोपे उपाय