भारतात शेती अद्यापही निसर्गाच्या भरवशावर केली जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकरी असूनही कष्टानेच आपली शेती करतात.
निसर्गावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्याची कुठल्याही पद्धतीची फसवणूक होऊ नये, यासाठी कृषी विभाग सज्ज असतो. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीटकनाशके खरेदी करताना फसवणूक झाल्याची शेतकऱ्यांची तक्रार असते.
अशी फसवणूक झाल्यास शेतकऱ्यांना तक्रार निवारण समिती, कृषी विभाग किंवा भरारी पथकांकडे आपली तक्रार नोंदवता येणार आहे.
अनेक बाबतीत शेतकऱ्यांची फसवणूक होते. बियाणे, कीटकनाशके दर्जेदार नसतात, शेतीसाठी जो काही माल घेतला जातो, तो जास्त भावाने दिला जातो, त्यांच्या पक्क्या पावत्या दिल्या जात नाहीत.
काहीवेळा बियाणे, खते काळ्या बाजारात विकली जातात आणि गरजू शेतकऱ्यांना ती मिळतच नाहीत, पेरणीच्या ऐन हंगामात धावपळ होऊ नये म्हणून कृषी विभागातर्फे खते, बियाणे उपलब्ध करून दिली जातात.
शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या जातात. मात्र, शेतकऱ्यांना या सर्व गोष्टी योग्य दरात आणि वेळेवर मिळतीलच, याची शाश्वती नसते.
अर्थात, शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यावर कठोर कारवाईचीही तरतूद आहे. बियाणे, खते किंवा कीटकनाशकांबाबत तक्रार असेल तर पक्के बिल, तक्रारीचे स्वरूप ही माहिती तक्रार निवारण समिती किंवा कृषी अधिकारी, भरारी पथकाकडे द्यावी लागते.
खते, बियाणे, कीटकनाशक दर्जेदार नसतील, शासकीय दरापेक्षा अधिक किंमत आकारण्यात येत असेल, बियाणे उगवलेच नाही, तर या संदर्भातल्या तक्रारी शेतकऱ्यांना करता येतात.
शेती निविष्ठांबाबत तक्रार असल्यास सर्व तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्याशी शेतकऱ्यांना थेट संपर्क साधता येतो.
अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?