सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने लागण हंगाम सन २०२५-२६ साठी पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांच्या सल्ल्याने ऊस लागण धोरण जाहीर केले आहे.
आडसाली लागण हंगाम १ जुलैपासून सुरू होणार आहे, तर पूर्व हंगामी सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर, सुरू हंगाम १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान होईल. याबाबत सोमेश्वर कारखान्याने प्रसिध्दीपत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
२ ते ३ जुलैपर्यंत लागण नोंदी बंद राहणार आहेत. ४ ते १४ जुलैपर्यंत लागण नोंदी ज्या-त्या तारखेस घेणे चालू राहील. १७ जुलैपर्यंत लागण नोंदी जास्त आल्यास त्याचा ड्रॉ काढण्यात येणार आहे.
आडसाली हंगामासाठी को ८६०३२, व्हीएसआय ९८०५ कोएम ०२६५ या ऊस जातींसाठी १ जुलै १४ ऑगस्टदरम्यान परवानगी देण्यात आली आहे.
पूर्वहंगामी ऊस लागणीकरिता को ८६०३२, व्हीएसआय ९८०५, कोएम ०२६५, व्हीएसआय १०००१, फुले १५०१२, फुले १३००७, व्हीएसआय ०८००५ या ऊस जातींसाठी १ सप्टेंबर ते २९ नोव्हेंबर दरम्यान परवानगी दिली आहे.
एमएस १०००१, को ८६०३२, व्हीएसआय ०८००५, व्हीएसआय ९८०५, फुले १५०१२, फुले १३००७, कोएम ०२६५ या ऊस जातीसाठी १ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी दरम्यान सुरू लागवडीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
हंगाम संपेपर्यंत तुटलेल्या सर्व जातींच्या खोडवा उसाच्या नोंदी घेण्यात येणार आहेत. रोप लागण ज्या दिवशी शेतात केली जाईल, त्या दिवशीचीच लागण तारीख नोंद घेतली जाईल. रोप लागणीस प्राधान्याने तोड देण्यात येणार आहे.
नियोजन करासभासदांनी त्यांच्या एकूण ऊस लागण क्षेत्रापैकी आडसाली ४० टक्के, पूर्व हंगामी १५ टक्के, सुरू १० टक्के आणि खोडवा ३५ टक्के या प्रमाणात ऊस लावण्याचे नियोजन करावे, असे आवाहन कारखान्याच्या वतीने करण्यात आले आहे.
हार्वेस्टर ऊस तोडणी करण्याकरिता प्राधान्य देण्यात आले आहे. सभासदांनी शेतात किमान साडेचार फूट अंतर ठेवून ऊस लागवड करावी. सोमेश्वर कारखाना यांत्रिकीकरणाला प्राधान्य देत असून, हार्वेस्टरमार्फत ऊस तोडणी झाल्यास प्रतिटन ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय सोमेश्वर कारखान्याने घेतला आहे. सभासदांनी कारखान्याकडे नोंदलेला ऊस संमतीशिवाय इतर कारखान्यास देऊ नये, अन्यथा साखर, ऊस रोपे, ऊस बियाणे, ताग, सोयाबीन बियाणे, कंपोस्ट खत आदी सवलती बंद करण्यात येणार आहेत. - पुरुषोत्तम जगताप, अध्यक्ष, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
अधिक वाचा: शेतकऱ्यांच्या उसाची बिले का मिळत नाहीत? काय आहेत कारखानदारांच्या अडचणी? वाचा सविस्तर