यावर्षी बुलढाणा जिल्ह्यात गव्हाची ७७ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी करण्यात आली आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यात तापमान वाढले आहे, ज्यामुळे गहू पिकावर परिणाम दिसून येत आहे.
काही ठिकाणी शेतकरी पाणी देऊन पीक वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सद्यःस्थितीत काही ठिकाणी पीक काढणीला आले आहे, तर काही ठिकाणी पीक ओंब्यावर आहे; मात्र या पिकाला अपेक्षित दर मिळतील का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
रब्बी हंगामात जिल्ह्यात हरभरा व गहू या दोन पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणात करण्यात येते. यावर्षी हरभऱ्याची पेरणी २ लाख ५६ हजार ६१९ हेक्टरवर करण्यात आली आहे.
गव्हाची ७७ हजार ६५१० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. यावर्षी पेरणी क्षेत्रात वाढ झाली आहे. मागील हंगामात चांगला पाऊस झाला. त्यामुळे विहिरींमध्ये पुरेसे पाणी असून, रब्बी हंगामातील पिके जोमदार आहेत.
उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना बसणार फटका
* जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक काढून गव्हाची पेरणी केली. कपाशीचे बोंडअळीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, तसेच कृषी विभागाने आगामी वर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव कमी व्हावा, याकरिता शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक काढून टाकण्याचे आवाहन केले होते.
* त्यामुळे शेतकऱ्यांनी कपाशी काढून गव्हाची पेरणी केली. सध्या तापमानात वाढ असल्याने गव्हाचे पीक सुकत आहे. वाढत्या तापमानामुळे उशिरा पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना फटका बसणार आहे.
गहू ३१८० रुपये प्रति क्विंटल
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत १७ फेब्रुवारी रोजी गव्हाला २,७०० ते ३,१८० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. सध्या बाजार समितीमध्ये गव्हाची आवक कमी आहे; मात्र जिल्ह्यातील गहू बाजारात आल्यावर आवक वाढणार आहे. त्यामुळे गव्हाचे भाव घसरण्याची शक्यता बाजारपेठेत वर्तविण्यात येत आहे.
काढणीनंतर आवक वाढणार!
जिल्ह्यातील गहू सध्या बाजारात यायचा आहे. त्यामुळे आवक कमी असून, खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत २०० क्विंटलच्या दरम्यान आवक होत आहे; मात्र काही दिवसांनी गव्हाची सोंगणी करण्यात येणार आहे. त्यानंतर गहू बाजारात आल्यावर आवक वाढणार आहे.
सद्यः स्थितीत शासनाच्या गोदामांमध्ये गहू नाही. बाजारात आवक कमी आहे. त्यामुळे गव्हाला चांगला दर मिळत आहे. बाजारात आवक वाढल्यानंतर १००-२०० रुपयांपर्यंत दर दबावात येतील. तरीही २६००-२८५० रुपयांपर्यंत गव्हाला दर मिळतील, तसेच मध्य प्रदेश सरकार गहू पिकाला काय बोनस देते, याकडेही लक्ष लागले आहे. - अविनाश सोनटक्के, अडत व्यावसायिक, खामगाव
हे ही वाचा सविस्तर :Harbhara Market: हरभरा खरेदीसाठी 'या' बाजारात होणार असा लिलाव वाचा सविस्तर