बुलढाणा जिल्ह्यात गव्हाच्या पिकामुळे (Wheat Crop) शेतशिवार हिरव्या रंगाने फुलून गेले आहे. यावर्षी गव्हाच्या लागवडीचा (Cultivation) क्षेत्रफळ ७७ हजार ६५१ हेक्टरपर्यंत पोहोचले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या (Farmer) चेहऱ्यावर आनंदाची लहर आहे. पिकामुळे शेतशिवाराने पांघरला हिरवा शालू असे चित्र पहायला मिळत आहे.
मागीलवर्षीच्या तुलनेत यंदा लागवड जास्त असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात दिसून येते. यावर्षी गव्हाच्या लागवड क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. त्यात वातावरणाची साथ लाभल्याने पीक चांगले बहरले आहे. काही ठिकाणी गहू ओंब्यावर असून, उत्पादनामध्येही वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून वर्तविण्यात येत आहे.
जिल्ह्यात रब्बी हंगामात गव्हाची लागवड विशेषतः मोठ्या प्रमाणावर केली जाते, कारण येथील माती व हवामान गव्हाच्या पिकासाठी अत्यंत उपयुक्त आहे, तसेच शेतकऱ्यांनी आधीच तंत्रज्ञानाच्या वापरावर लक्ष केंद्रित केले असून, त्यांचे उत्पादन अधिक चांगले होण्याची शक्यता आहे.
यंदा शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन मिळाले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना निरोगी व गुणवत्तेचे पीक घेण्यासाठी करावयाच्या उपाययोजना यावर माहिती दिली.
७७ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड
खरीप हंगामात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी ७७ हजार ६५१ हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची लागवड केली आहे.
निसर्गाची साथ, शेतकऱ्यांचा उत्साह
यंदा शेतकऱ्यांना हवामानाची साथ लाभली व अवकाळी पावसाचे दिवस कमी झाले. पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने विहिरी, कूपनलिकांमध्ये काही प्रमाणात जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे उत्पादन पातळीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य किंमत मिळेल, अशी आशा आहे.
व्यवस्थापनावर भर
यांत्रिकीकरण, आधुनिक तंत्रज्ञान आणि रासायनिक खतांच्या वापरामुळे पीक जोमदार आहे. शेतकऱ्यांनी जलसंधारण व योग्य पाणी व्यवस्थापनावर देखील भर दिला आहे.
सध्या पीक ओंबावर आहे. गव्हाला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा ठेवून शेतकरी कष्ट करत आहोत. सरकारने देखील काही योजना सुरू केल्या आहेत; परंतु शेतकऱ्यांपर्यंत या योजनांचा लाभ लवकर मिळत नाही. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. - गोपाल सावरकर, शेतकरी, भालेगाव.
सध्या गहू व हरभऱ्याचे पीक चांगले आहे. पोषक वातावरणही आहे. यातून चांगले उत्पादन मिळणार यात शंका नाही. यंदा भावदेखील चांगला मिळेल, अशी अपेक्षा आहे. - संजय तायडे, शेतकरी
जिल्ह्यातील गहू पिकाचा पेरा
गहू पिकाचे सरासरी क्षेत्र | ५६,३९६ |
पिकाचे लागवड क्षेत्र | ७७,६५१ |
पिकाची टक्केवारी | १४० |
हे ही वाचा सविस्तर : Agro Advisory : वाढत्या तापमानात कसे कराल पिकांचे नियोजन वाचा सविस्तर