गावातून बाहेर जाणारी सडक आहे. त्या दिशेला गावापासून चार सहा किलोमीटर अंतरावर एक-दोन बारकी-बारकी गावं आहेत. खूप वर्षांत त्या सडकेने गेलो नव्हतो. परवा काही कारणाने एका गावाला जायला निघालो, तर रस्त्याकडेनी नुसती घरं-घरं झालेली. प्रत्येक शेताच्या तुकड्यात बारीकमोठी कितीतरी घरं.
सगळी मागच्या पाचपंधरा वर्षात तिथे अवतरलेली. जिथे अजून घरं नाहीत, त्या तुकड्यांमध्येही कुठे पाया खोदलेला, तर कुठे वाळू विटांचे ढीग. माझ्या लहानपणी गावाबाहेर पडल्यावर या वाटेनं जाताना पोरांच्या आत दिवसासुद्धा भय दाटून येई. धूळमाखली अरुंद पायवाट आणि दुतर्फा अंगावर येणारा गर्ददाट गच्च झाडोरा.
मध्येच एक बारीकसा पावसाळी ओढा आणि भोवतीने चौफेर दाटलेली किर्रर्र शांतता असे. क्वचित आसपास कुठे काम करत असलेल्या एखाद्या गडचाची हाळी ऐकू येई, एरवी काही पाखरांचे आवाज वगळता खरोखरच पोराटोरांना नखशिखांत भेदरवणारी किर्रर्र शांतता असे भरदिवसा तिकडे. घनदाट भय वाटे त्या पायवाटेनं पलीकडे जाताना.
आणि आता त्या वाटेला गिळून टाकलेल्या अजगरासारखी ही लांबलचक डांबरी सडक। आणि तो गच्च मातलेला झाडोरा कुठे गेला इकडचा? भोवतीभरातल्या शेतांमधून अधूनमधून दिसणारे गवताने किंवा तूरकाड्यांनी शाकारलेले गोठे नाहीसे झालेले किंवा पत्र्याच्या भक्कम शेडमध्ये बदललेले आणि शेताशेतांत बांधली जात असलेली ही सिमेंटी घरं.
या रस्त्याने जाताना आता भीती वाटत नाही. म्हणजे वयाने वाढलेल्या माझं सोडा, आताच्या पोरांनाही ती वाटत नसणार. सगळीकडे घरंच घरं, माणसंच माणसं दिसत असल्यावर कुणाला भीती का वाटेल? माणसं गावाबाहेर फार राहायला आलीयत. गावात माणसांची गर्दी आहेच, पिढ्यान् पिढ्या मोठमोठी कुटुंबं राहत आली होती, ती घरं पुढच्या पिढ्यांच्या चौकोनी 'फॅमिलीं'ना अपुरी वाटून लोक गावाबाहेर स्वतःच्या किंवा इतरांच्या शेतात जागा घेऊन घरे बांधत आहेत.
ज्या वाटा रस्त्यांना, शेतांना 'मार्केट' आलेलं आहे, तिकडे तर घरा-दुकानांची आणि माणसांची गर्दी बघून कधीकाळी पाहिलेलं तिकडचं शेतशिवार तेव्हा आपण स्वप्नात पाहिलेलं होतं की काय, अशी शंका यायला लागते, इतकं गावठाण बदलले-विस्तारलं आता. माझ्या लहानपणी गावालगतच्या मोकळ्या जागेत किंवा शेतात सरकारने गरीब लोकांना राहण्यासाठी खूप लहान-लहान जागा दिल्या होत्या.
जमिनीच्या त्या तुकड्यांना 'फलाट' असं म्हणत. त्या टीचभर फलाटांवर लोकांनी झोपडीसारखी बारीकशी घरं बांधली आणि गावातली काही, गावकुसाबाहेरची काही मंडळी तिथे राहायला गेली, तेव्हा गावात मजबूत जुन्या घरांमधून राहणारे लोक त्या माणसांकडे काहीशा हलकेपणाच्या भावनेने बघत.
आता गावापासून सगळ्या दिशांनी अर्ध्या एक किलोमीटरपर्यंत शेतजमिनीचे 'प्लॉट' पाहून ते विकण्याचा विकत घेण्याचा धंदा अत्यंत तेजीत चाललेला आहे. सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापली की, एकरकमी भरमसाठ पैसा हातात येतो. चालू पिढी पैशांत खेळायला लागते. पुढच्या पिढ्यांची चिंता करायला कुणालाच वेळ, गरज, सवड उरलेली नाहीय. गावालगतची शेतं क्रमशः संपत चाललेली दिसतात.
गावं आक्रमण करतायत शेतांवर. शेती म्हणजे मायमाती, शेती म्हणजे काळी आई असं मनापासून म्हणणारे ते भाबडे लोक हरवले आहेत नाण्यांच्या खणखणाटात कुठेतरी. शेतं संपून गेली तर माणसं काय खातील कुणास ठाऊक!
बालाजी सुतारकवी-कथाकार
Web Summary : Rapid urbanization consumes farmlands as houses replace fields. Nostalgia for the past contrasts with present-day construction boom. Concerns rise about future food security as agricultural land dwindles, questioning what future generations will eat.
Web Summary : तेजी से शहरीकरण के कारण खेत खत्म हो रहे हैं, खेतों की जगह मकान बन रहे हैं। अतीत की यादें वर्तमान के निर्माण कार्यों से विपरीत हैं। भविष्य में खाद्य सुरक्षा को लेकर चिंता बढ़ रही है क्योंकि कृषि भूमि कम हो रही है, जिससे सवाल उठता है कि आने वाली पीढ़ी क्या खाएगी।