पावसाळ्याच्या दिवसांत शेतमालक, शेतमजूर तसेच वनभ्रमंती करणारे नागरिक गाजरगवताच्या संपर्कात येतात आणि त्यातून ॲलर्जीच्या विविध लक्षणांना सामोरे जावे लागते.
गाजरगवत ही एक हानिकारक आगंतुक वनस्पती असून, तिचा मानवी शरीरावर तीव्र प्रतिकूल परिणाम होतो. यामुळे त्वचाविकार, श्वसनविकार, डोळ्यांची आग, ताप आणि दम्याचे त्रास निर्माण होतात अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.
टाळण्यासाठी काय काळजी घ्याल?
शेतात काम करताना संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालावे. ट्रेकिंग, वन पर्यटन करतानाही संपूर्ण शरीर झाकले जाईल, असेच कपडे परिधान करावे, गाजरगवताला बीजे येण्यापूर्वीच मुळासकट उपटावे. हे करत असताना आपल्या हातामध्ये सुरक्षामक हातमोजे घालणे महत्त्वपूर्ण असते.
ॲलर्जीची प्राथमिक लक्षणे कोणती?
त्वचेवर पुरळ : गाजरगवताच्या संपर्कानंतर त्वचेवर लहान पुरळ उठतात.
असह्य खाज : संपर्क झालेल्या भागात तीव्र खाज सुटते.
पुरळातून पाणी : खाजवल्यास पुरळातून पाणी येते व त्वचा अधिक संक्रमित होते.
श्वसन समस्या व ताप : काही रुग्णांमध्ये दम्याचे किंवा तापाचे लक्षणही दिसून येतात.
गाजरगवताची ॲलर्जी झाल्यानंतर प्रथमोपचार म्हणून खोबरेल तेल, कोरपडचा गर लावता येतो. मात्र, त्रास वाढल्यास तसेच गंभीर स्वरूपाची ॲलर्जी झाल्यास त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घ्यावा. औषधी, लोशनद्वारे ॲलर्जी बरी होते. - डॉ. नीलेश टापरे, वैद्यकीय अधीक्षक, खामगाव जि. बुलढाणा.
धोका कोणाला?
गाजरगवत हे कोणत्याही ऋत्तूमध्ये आणि कुठल्याही प्रकारच्या जमिनीमध्ये उगवण्यास सक्षम असते. गाजरगवताचे बीज हे हवा, पाणी किंवा सजीव प्राण्यांमुळे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वितरित होतात आणि गाजरगवताचा प्रभाव वाढवतात.
हेही वाचा : रेशीम शेती प्रयोगातून चमकले नशीब; संजय नाईकवाडे यांनी निर्माण केला शेतकऱ्यांपूढे आदर्श