जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर करून नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले तीन महिन्यापर्यंत टिकू शकते हे पुणे जिल्ह्यातील चामखेडे येथील नितीन गायकवाड यांनी सिद्ध करून दाखवले आहे. त्यांच्या शेतातील कलिंगड हे तोडल्यानंतर तीन महिन्यापर्यंत चांगले राहते. हा अनुभव त्यांना स्वतःला आणि त्यांच्याकडून कलिंगड विकत घेतलेल्या ग्राहकांना सुद्धा आला आहे.
दरम्यान, चांदखेड येथील नितीन गायकवाड हे मागील अनेक वर्षांपासून कमी रसायनिक खतांचा वापर करून शेती करतात. यामध्ये ते भात, कांदा, पालेभाज्या पिके, फळभाज्या पिके, कलिंगड आणि खरबूज हे पिके घेतात. या पिकांसाठी ते हिरवळीचे खत, शेणखत, लेंडीखत, कोंबडी खत, जीवामृत, गुळाचे पाणी, दूध, बेसन पीठ या गोष्टींचा वापर करतात. शेतीसाठी केमिकलचा वापर करत नसल्यामुळे त्यांनी पिकवलेल्या शेतमालाला बाजारात चांगली मागणी आहे.
मातीला श्रीमंत करा
तुमची माती निरोगी नसेल तर त्या मातीतून चांगले उत्पादन घेऊ शकत नाही. त्यामुळे मातीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवण्याचा प्रयत्न करा. जास्तीत जास्त हिरवळीचे खते आणि सेंद्रिय निविष्ठांचा वापर करा. रासायनिक खताचा वापर हळूहळू कमी करा असा सल्ला नितीन गायकवाड शेतकऱ्यांना देतात.
कलिंगड ३ महिने कसे टिकते?
"तोडणी केल्यानंतर साधारण तीन महिन्यापर्यंत कलिंगड चांगले राहते. तीन महिन्यांनी कापल्यानंतर या कलिंगडातील पाणी कमी होते आणि गोडवा वाढतो. कलिंगड पिकवताना मी कोणत्याही प्रकारच्या रासायनिक खताचा वापर करत नाही, सेंद्रिय निविष्ठा, जीवामृत, दूध या गोष्टी देत असल्यामुळे कलिंगडाची टिकवण क्षमता वाढते आणि कलिंगड तीन महिन्यापर्यंत टिकते. आम्ही सुद्धा मे महिन्यामध्ये तोडलेले कलिंगड भात लावणी पर्यंत खातो" असा दावा नितीन गायकवाड यांनी केला आहे.
यासोबतच आज तोडलेले कलिंगड जवळपास 20 दिवसांनी खाल्ले तरी चांगले निघाले असा त्यांच्याकडून कलिंगड खरेदी केलेल्या ग्राहकांना आला आहे. शेतीला कमीत कमी रासायनिक खते आणि जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केला तर आपले उत्पादन चांगले आणि टिकाऊ राहते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने एक काय पाळली पाहिजे आणि शेतीला जास्तीत जास्त सेंद्रिय निविष्ठा दिल्या पाहिजे असे नितीन सांगतात.