Pune : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पश्चिम भागात म्हणजे भिमाशंकर परिसरात जानेवारी महिन्याच्या सुरूवातीच्या आठवड्यामध्ये पाण्याची टंचाई भासू लागली आहे. विशेष म्हणजे याच भागात सर्वांत जास्त पाऊस पडतो आणि याच भागात सर्वांत लवकर दुष्काळाच्या झळा सहन कराव्या लागतात. उन्हाळ्यात पिण्याच्या आणि वापरण्याच्या पाण्यासाठी येथील नागरिकांना वणवण करावी लागते.
पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुका आणि शिरूर तालुक्याचा काही भाग वगळला तर बाकीच्या तालुक्यांत पाण्याची समस्या जास्त नाही. पण आंबेगाव तालुक्याचा पश्चिम भाग हा सह्याद्री घाटमाथ्याचा आहे. या घाटावर मान्सूनमध्ये जोरदार पाऊस पडतो पण पाणी मुरण्याची व्यवस्था येथे नाही. काळ्या खडकामुळे या जमिनीत पावसाचे पाणी मुरत नाही. यामुळे येथील विहिरींना दिवाळीनंतर पाणी कमी होऊ लागते. परिसरातील एकूण विहिरींपैकी केवळ १० ते २० टक्के विहिरींनाच पाणी असल्याचं स्थानिक सांगतात.
दरम्यान, जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात पोखरी, तळेघर, भिमाशंकर परिसरात राहणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता भासत आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना रब्बी पिकांना पाणीच नसते. कमी पाण्यावर किंवा शून्य पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड या शेतकऱ्यांना करावी लागते. यामध्ये हरभरा, मसूर आणि काळ्या वटाण्याचा सामावेश आहे.
येथील अनेक पाण्याचे स्त्रोत तळाला गेले असून दुर्गम भागातील नागरिकांना डोक्यावर पाणी आणावे लागत आहे. याबरोबरच शेतीला पाणी नसल्यामुळे उन्हाळी पिके घेता येत नाहीत. घरगुती खाण्यासाठी लावलेला भाजीपाला जगवण्यासाठी शेतकऱ्यांना मडक्यांचा वापर करावा लागत आहे. मडक्यामध्ये पाणी ठेवल्यामुळे पाण्याची बचत होत असल्याचं शेतकरी सांगतात.
दिवाळीनंतर आम्हाला पाणी पुरत नाही म्हणून आम्ही घेवड्याच्या वेलीच्या बुडख्याजवळ पाण्याचे मडके ठेवले आहेत. यामुळे पाण्याची बचत होते आणि जमिनीत पाणी सारखे मुरलेले असते.- पांडुरंग रढे (शेतकरी, फळोदे, ता. आंबेगाव)