Join us

Vela Amavasya 2024 : वेळ अमावास्या शब्द कसा रुढ झाला? काय आहे ह्यामागील परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 12:01 IST

वेळअमावस्या हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण असून ज्वारीचे कोठार असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.

मल्लिकार्जुन देशमुखेमंगळवेढा : वेळअमावस्या हे ग्रामीण संस्कृतीचे प्रतीक आणि वनभोजनाचा आनंद देणारा सण असून ज्वारीचे कोठार असणाऱ्या मंगळवेढा तालुक्यात वेळ अमावस्या सण मोठ्या उत्साहात साजरा होतो.

पांडवपूजन.. विविध भाज्यांचे मिश्रण असलेली गावरान भाजी.. ज्वारी, बाजरीचे उंडे.. आंबील, ताक अशा फक्कड वनभोजनाचा आस्वाद घेण्यासाठी सोमवारी ज्वारीचे कोठार फुलणार आहे, शेतातील पिकांच्या सान्निध्यात हा दिवस सण-उत्सवाप्रमाणे साजरा केला जातो.

ज्वारीचे कोठारात ज्वारीचे पीक चांगले डोलत आहे, यंदा पाऊसमान चांगले झाले आहे. ही वेळ अमावस्या वर्षातून एकदाच येते. त्यामुळे सर्व शेतकरी आतुरतेने या अमावस्येची वाट पाहात असतात.

या दिवशी शहरातून ग्रामीण भागाकडे जाणारे रस्ते दुचाकी चारचाकी, बैलगाडी, ट्रॅक्टरसह एसटी बसने जाण्यासाठी गर्दीने फुलून गेलेले असतात. विशेष म्हणजे, आज शाळांना व कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे, त्यामुळे यावर्षी शेतात जेवणासाठी जाणाऱ्यांची गर्दी मोठी होणार आहे.

मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या म्हणजे पांडवपूजेचा दिवस मानला जातो. ज्वारी, गव्हाच्या ताटव्यांमध्ये प्रतीकात्मक पांडवांची पूजा, हे आजच्या दिवसाचे महत्त्व मानले जाते.

या पूजेतून पाच पांडवांना शेतातील पिकांच्या संरक्षणाची जबाबदारी सोपविली जाते, वेळ अमावस्येला शेतात उत्पादित होणाऱ्या सगळ्या गोष्टींची तसेच ग्रामदेवतांची पूजा केली जाते.

शेपू, पालक, चुका, मेथी, बोरे आदी पालेभाज्यांच्या मिश्रणाने तयार केलेली भाजी, ज्वारी व बाजरीच्या पिठाचे उंडे हे या पांडव पूजेतील नैवेद्याचे वैशिष्टय, होय, पुरणपोळी, शेंगदाणा, गुळाच्या पोळ्यांनाही या भोजनात विशेष स्थान असते.

एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रूपात आस्वाद घेतला जातो.

वेळ अमावास्या शब्द कसा झाला रुढ■ कन्नड भाषेत येळ म्हणजे सात. कर्नाटकमध्ये पेरणीनंतर सातव्या अमावस्येला येळ्ळी अमावस्या साजरी केली जाते.■ मूळ कन्नड शब्द असलेल्या येळ्ळी अमावस्या याचा अपभ्रंश होऊन तो कर्नाटकच्या सीमेवरील सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात येळ अमावस्या किंवा वेळ अमावस्या असा झाला.■ अमावस्या दर्शवेळा अमावस्या म्हणूनही ओळखली जाते.■ मूळ कानडी शब्द "येळ्ळ अमावस्या" म्हणजे पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या म्हणजे येळी अमावस्या, याचाच अपभ्रंश होऊन वेळ अमावस्या हा शब्द रूढ झाला आहे, अशी माहिती ज्येष्ठ नागरिक यशवंत पाटील यांनी दिली.

अधिक वाचा: लाडकी बहिण योजनेचा अर्ज मंजूर पण पैसे जमा झाले नाहीत? असे करा ऑनलाईन चेक

टॅग्स :शेतीशेतकरीपीककाढणीज्वारीबाजरीभाज्याअन्न