प्रशांत शिंदे
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस आणि मुबलक पाणी असल्यामुळे रबी हंगामाचा चांगला पेरा झाला आहे. ऐन रबी हंगामात खतांची गरज असताना परवानाधारक विक्रेत्यांकडून युरिया खताची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात आहे. खत शिल्लक नसल्याचे सांगून जादा दराने विक्री होत आहे, तर काही कृषी दुकानातून अन्य खते लिंकिंग करून विकली जात आहेत. याचा आर्थिक फटका जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बसत आहे.
जामखेड, श्रीगोंदा तालुक्यातील काही परवानाधारक विक्रेत्यांकडे युरियाचा तुटवडा आहे. तर काही विक्रेत्यांकडे युरियाचा साठा शिल्लक आहे. प्रशासनाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील खत दुकानात १७,८७७ मेट्रिक टन युरिया तर ४,१८६.७ मेट्रिक टन डीएपीचा साठा उपलब्ध आहे. प्रत्यक्षात मात्र गरज असताना देखील अनेक दुकानातून युरियाची कृत्रिम टंचाई करण्यात आली आहे. हीच परिस्थिती जिल्ह्यातील इतर तालुक्यातही आहे.
रबी हंगामासाठी शेतकऱ्यांकडून युरियाची मोठ्या प्रमाणात मागणी होत असते. मात्र, खत विक्रेत्यांकडून खत उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते. काही मोजक्या खत दुकानात युरिया उपलब्ध आहे. मात्र, या दुकानदारो कर्दन प्रती पोत्यामागे १०० ते १५० रुपये ज्यादा दराने विक्री केली जात आहे.
तर अनेक खत विक्रेत्यांकडून युरिया हवा असेल, तर इतर खतांचे लिंकिंग करून सक्ती केली जाते. युरियासाठी काही शेतकऱ्यांना लिंकिंगद्वारे खत घेऊन नाहक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ऐन गरजेच्या वेळी युरिया उपलब्ध होत नसल्यामुळे शेतकऱ्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.
कृषी विभाग म्हणतो तक्रार करा...
जामखेड, श्रीगोंदा तालुक्यात अनेक ठिकाणी जादा दराने खत विक्री किंवा लिंकिंग केली जात आहे. तालुका कृषी विभागाकडून युरिया उपलब्ध असलेल्या दुकानांची यादी प्रसिद्ध केली जाते. परंतु या दुकानांची यादी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. विभागाने स्वतः दखल घेऊन स्टिंग ऑपरेशन केले तर शेतकऱ्यांची लूट करणारे दुकानदार सापडतील. शिवाय शेतकऱ्यांना तक्रार करता यावी, यासाठी प्रत्येक दुकानात टोल फ्री नंबर लावणे बंधनकारक केले पाहिजे.
तालुकानिहाय खतसाठा
| तालुका | डीएपी | युरिया |
| अकोले | २८६ | ६०७ |
| जामखेड | १०२ | ३७७ |
| कर्जत | ४१७ | १७८६ |
| कोपरगाव | ३१२ | ८१३ |
| नगर | १४० | ६८५ |
| नेवासा | ६३१ | २,८८० |
| पारनेर | २६९ | ५३० |
| पाथर्डी | १७२ | १,०८६ |
| राहता | १३३ | १,१३१ |
| राहुरी | ३६० | १,२७२ |
| संगमनेर | २३५ | २,१२१ |
| शेवगाव | ३४२ | १,५६९ |
| श्रीगोंदा | ५०७ | १,८३० |
| श्रीरामपूर | २३५ | १,००५ |
जिल्ह्यात आवश्यक खतांचा साठा उपलब्ध आहे. तुटवडा असलेल्या ठिकाणी खतांची आवक सुरू आहे. लिकिंग किंवा जादा दराने खतांची विक्री होत असल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडे तक्रार करावी. नियंत्रण निरीक्षक विभागाकडून सातत्याने तपासणी सुरू असते. - राहुल ढगे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, कृषी विभाग, अहिल्यानगर.
