Unseasonal Rain : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंगळवारी (६ मे) दुपारी आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीने शेतकऱ्यांच्या अपेक्षेवर पाणी फिरवले आहे. कांदा, मका, बाजरीसह आंबा, पपई, केळी, भाजीपाला आणि बी-बियाण्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. (unseasonal rains)
वैजापूर, गंगापूर, सिल्लोड, कन्नड आणि फुलंब्री या पाच तालुक्यांमध्ये गारपिटीचा जबरदस्त फटका बसला. कांदा, मका, बाजरी, आंबा, पपई, भाजीपाला आणि बियाणे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक घरांची पत्रे उडाली, वीजपुरवठाही काही तास खंडीत झाला होता तर झाडे कोसळून वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. (unseasonal rains)
वैजापूर तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी गारपीट
वैजापूर तालुक्यात मंगळवारी बाजाठाण, गाई पिंपळगाव, नागमठान, महालगाव भागात गारपिटीने थैमान घातले. शेतातील कांदा व मका जमीनदोस्त झाला. वीजपुरवठा खंडित झाला. शेतकऱ्यांनी उभ्या पिकांबरोबरच साठवलेले कांद्यावर पाणी फिरले. (unseasonal rains)
गंगापूर तालुक्यात कांद्याचे नुकसान
गंगापूरच्या लासूर स्टेशन, वाळूज, सातखेडा, मांजरी, नेहरगाव परिसरात दुपारनंतर गारपिटीसह पाऊस झाला. काढून ठेवलेले कांदे खराब झाले. याशिवाय बाजरी व मका पिकांनाही मोठा फटका बसला आहे.
सिल्लोडमध्ये विजेचा खोळंबा
उंद्रणगाव, घाटनांद्रा, आमठाणा, पेडगाव, अजिंठा, शिवना या भागात दुपारी चारनंतर जोरदार वादळ व गारपीट झाली. विजेच्या तारांचे नुकसान झाल्याने नागरिकांना रात्रीपर्यंत अंधारात राहावे लागले. आंबा व कोथिंबीर पिकाचे नुकसान झाले.
फुलंब्रीत घरांचे नुकसान
फुलंब्री शहरात आठवडी बाजार सुरू असताना वादळी वाऱ्याने पाल उडाले, दुकानदारांचे साहित्याचे नुकसान झाले. गणोरी-नायगाव रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक तब्बल दोन तास बंद राहिली. घरांची पत्रे उडून संसारोपयोगी साहित्यही वाहून गेले.
कन्नड तालुक्यातील हतनूर, नागद परिसरात पीके जमीनदोस्त
कन्नड तालुक्याच्या नाचनवेल, पिशोर, नागद, हतनूर परिसरात गारपीट आणि पावसामुळे मका, बाजरी, केळी, पपई यांसह कांदा व कांदा बियाण्यांचेही नुकसान झाले. बाजारसावंगी, दौलताबाद परिसरात विजेचा पुरवठा खंडित झाला. आंब्याच्या कैऱ्याही झडल्या.
खुलताबाद तालुक्यात पावसाचा कहर
खुलताबाद शहरासह वेरुळ, गल्लेबोरगाव, तिसगाव परिसरात पावसामुळे कांदा चाळींवर पाणी गेले. फट्टे उडाले. अर्धवट वाळलेला कांदा सडण्याची वेळ आली आहे. याशिवाय उस, बाजरी, मका यांचेही नुकसान झाले.
नुकसान भरपाईची मागणी
या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या हाती पिकाचे उत्पन्न येण्याआधीच कोलमडले आहे. शेतकरी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी करत आहेत.