देवगड : युनिक कोड आणि स्कॅनिंग आंब्यामुळे देवगडचा खात्रीशीर हापूस आंबा ग्राहकांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी व्यक्त केला.
देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेच्यावतीने कट्टा तिठानजीक असलेल्या आंबा पॅकिंग, ग्रेडिंग सेंटर येथे आंबा स्कॅनिंग मशीनचा उद्घाटन सोहळा जिल्हाधिकारी अनिल पाटील व जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी आंबा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार अॅड. अजित गोगटे, उपाध्यक्ष दत्तात्रय बलवान, उद्योगपती नंदकुमार घाटे, जिल्हा बँक संचालक अॅड. प्रकाश बोडस, अॅड. अविनाश माणगावकर, तहसीलदार आर. जे. पवार, निरंजन दीक्षित, सुधीर जोशी, विद्याधर जोशी, विद्याधर माळगांवकर, तालुका कृषी अधिकारी पाटील, व्यवस्थापक संतोष पाटकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी म्हणाले, देवगडचे नाव हापूस आंब्यासाठी जगप्रसिद्ध आहे. आंब्यातील साक्यामुळे आणि देवगड हापूसच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या अन्य आंब्यांमुळे खात्रीशीर देवगड हापूस ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही.
मात्र, आंबा उत्पादक संस्थेने आंबा बागायदारांसाठी आणलेल्या यूनिक कोडच्या प्रणालीचा बागायतदारांना मोठा फायदा होणार आहे. फळमाशी नियंत्रणासाठी शासनामार्फत उपाययोजना राबविल्या जात आहेत.
मनिष दळवी म्हणाले, देवगड तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील आहेत. त्यामुळे ग्राहक शंका उपस्थित करीत नाहीत. येथील बागायतदार उत्पादक तडजोड करीत नसल्याने फळाचा दर्जा योग्य राहतो.
फळबागायतीमध्ये उत्पादन घटत आहे. त्यावरील व्यवस्थापन खर्च वाढत आहे. परिणामी बागायतदारांना नफा कमी प्रमाणात मिळत आहे. त्यामुळे नवीन बाजारपेठा आवश्यक आहेत.
नांदगाव येथे १४ एकर क्षेत्रात मार्केटयार्ड उभे राहत असून, येत्या काही दिवसांतच त्याचे भूमिपूजन होईल. सिंधुरत्न समृद्धी योजनेतून ४ कोटी २५ लाख अनुदान विविध सोयीसुविधांसाठी उपलब्ध झाले आहे.
आंबा बागायतदार विद्याधर जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. अजित गोगटे यांनी प्रास्ताविक तर ऋत्विक धुरी यांनी सूत्रसंचालन केले. सुधीर जोशी यांनी आभार मानले.
अधिक वाचा: वाशी मार्केटमध्ये हापूससह बदामी लालबाग, तोतापुरीही दाखल; कोणत्या आंब्याला मिळतोय किती दर?