पुणे : आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष व सहकारी साखर कारखानदारीच्या हीरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सहकारी साखर कारखान्यांची गुणवत्ता वाढविणे.
तसेच कारखान्यांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण करण्यासाठी स्पर्धात्मक गुणवत्ता असणाऱ्या कारखान्यांची निवड करून त्यांना सन्मानित करून प्रोत्साहित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
त्यात ५००० टन प्रतिदिनपेक्षा कमी आणि त्यापेक्षा जास्त गाळप क्षमता अशी वर्गवारी करून कारखान्यांची निवड करून सर्वोत्कृष्ट ६ सहकारी व ६ खासगी साखर कारखान्यांची पारितोषिक विजेते म्हणून निवड करण्यात येणार आहे.
राज्यात सुमारे २०० कारखाने असून, त्यात सहकारी व खासगी कारखान्यांची संख्या सारखीच आहे. यातील अनेक कारखाने चांगली कामगिरी करून शेतकऱ्यांना वेळेवर उसाची बिले देतात.
त्यातून हे कारखाने चांगला नफाही कमावतात. अशा कारखान्यांकडून उत्पादकता वाढीसाठीही प्रयत्न केले जातात. कारखान्यातील कामगारांसाठी विशेष प्रयत्न केले जातात.
तसेच संशोधित जातींचा प्रसार करण्यासाठीही शेतकऱ्यांमध्ये जागृती केली जाते. अशा कारखान्यांना सध्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटकडून सन्मानित केले जाते.
यात राज्य सरकारचा सहभाग नाही. या कारखान्यांना सन्मानित करण्यासाठी राज्यस्तरावरही पुरस्कार असावेत, असा प्रस्ताव राज्य सरकारपुढे होता. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुरस्कार देण्यासाठी ९ प्रकारांसाठी गुणांकन पद्धत
१) वेळेवर संपूर्ण रास्त आणि किफायतशीर किंमत देणे.
२) सर्वाधिक साखर उतारा, प्रति हेक्टरी ऊस उत्पादन.
३) कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि सर्वाधिक क्षेत्र कव्हरेज.
४) कमी कार्बन उत्सर्जन आणि उच्च कार्बन क्रेडिट्स.
५) शासकीय कर्जाची वेळेवर परतफेड.
६) खर्च.
७) लेखापरीक्षण.
८) दोष दुरुस्ती अहवाल आणि एकूण कार्यक्षमता.
९) कर्मचारी संख्या मर्यादा व वेतन देणे यांचा समावेश आहे.
दोन समितीतर्फे छाननी
◼️ कारखान्यांच्या निवडीसाठी दोन समित्यांद्वारे छाननी केली जाईल.
◼️ अर्जाचे पुनरावलोकन व पारितोषिक विजेत्यांची निवड करण्यासाठी छाननी समिती साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे.
◼️ प्रादेशिक सहसंचालक त्यांच्या विभागातील उत्कृष्ट असलेले प्रत्येकी ३ सहकारी कारखाने व ३ खासगी कारखान्यांची यादी छाननी समितीस सादर करतील.
◼️ त्यानंतर छाननी समिती प्राप्त झालेल्या प्रस्तावांमधून उत्कृष्ट १२ सहकारी व १२ खासगी साखर करखान्यांची यादी निवड समितीकडे सादर करेल.
◼️ या निवड समितीचे अध्यक्ष सहकारमंत्री असतील.
◼️ तर सहकार राज्यमंत्री, सहकार विभागाचे प्रधान सचिव, साखर आयुक्त, सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे उपसचिव सदस्य असतील.
◼️ १२ उत्कृष्ट खासगी कारखान्यांच्या यादीमधून निवड समिती सर्वोत्कृष्ट ६ सहकारी व ६ साखर कारखान्यांची निवड करेल.
यासंदर्भात प्रादेशिक स्तरावरून अर्ज मागविण्यात येणार आहेत. गेल्या वर्षाच्या माहितीच्या आधारे ही पारितोषिके देण्यात येणार आहेत. पारितोषिकांचे स्वरूप आणि इतर तपशील लवकरच घोषित करण्यात येणार आहेत. - डॉ. संजय कोलते, साखर आयुक्त
