Lokmat Agro >शेतशिवार > Termeric : मराठवाड्यातील हळद उत्पादन वाढले!  शेतकऱ्यांना फायदा किती?

Termeric : मराठवाड्यातील हळद उत्पादन वाढले!  शेतकऱ्यांना फायदा किती?

Turmeric production in Marathwada has increased! How much does it benefit farmers? | Termeric : मराठवाड्यातील हळद उत्पादन वाढले!  शेतकऱ्यांना फायदा किती?

Termeric : मराठवाड्यातील हळद उत्पादन वाढले!  शेतकऱ्यांना फायदा किती?

जगातील एकूण हळद उत्पादनापैकी जवळपास ७९ टक्के हळदीचे उत्पादन भारतात होते. याव्यतिरिक्त बांग्लादेश, म्यानमार या देशांमध्ये हळदीचे उत्पादन होत असून मोठ्या प्रमाणावर हळद आणि हळद पावडरीची निर्यात भारतातून होते.

जगातील एकूण हळद उत्पादनापैकी जवळपास ७९ टक्के हळदीचे उत्पादन भारतात होते. याव्यतिरिक्त बांग्लादेश, म्यानमार या देशांमध्ये हळदीचे उत्पादन होत असून मोठ्या प्रमाणावर हळद आणि हळद पावडरीची निर्यात भारतातून होते.

शेअर :

Join us
Join usNext

Pune : कोरोना काळानंतर जगाबरोबर कृषी क्षेत्रातही मोठे बदल झाले. आरोग्याचे महत्त्व समजून लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारातील हळदीचे प्रमाण वाढवले आणि जागतिक स्तरावर हळदीची मागणी वाढली. भारत हा जगातील सर्वांत मोठा हळद उत्पादक देश असला तरी नैसर्गिक आपत्तीमुळे उत्पादन घटले आणि दरामध्ये जवळपास दुप्पट वाढ झाली. ५ ते ६ हजारांवर असलेली हळद १२ ते १४ हजारांवर पोहोचली पण शेतकऱ्यांना या वाढलेला दराचा तेवढा फायदा होताना दिसत नाही.

जगातील एकूण हळद उत्पादनापैकी जवळपास ७९ टक्के हळदीचे उत्पादन भारतात होते. याव्यतिरिक्त बांग्लादेश, म्यानमार या देशांमध्ये हळदीचे उत्पादन होत असून मोठ्या प्रमाणावर हळद आणि हळद पावडरीची निर्यात भारतातून होते. युएई, अमेरिका, बांग्लादेश, श्रीलंका, जपान, मलेशिया, लंडन आणि इतर आशियाई देशातून हळदीला मागणी आहे.

देशातील एकूण हळद उत्पादनापैकी जवळपास ८५ टक्के हळदीचे उत्पादन महाराष्ट्रात होते. त्यापाठोपाठ तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू हे राज्ये आघाडीवर आहेत. महाराष्ट्रातील सांगली आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत परिसरात मोठ्या प्रमाणावर हळदीचे उत्पादन घेतले जात असून राज्यातील हे दोन बाजार हळदीच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहेत. सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनसुद्धा प्राप्त झाल्यामुळे या हळदीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. 

मराठवाड्यात हळदीचे उत्पादन वाढले
कोरोनानंतर मराठवाड्यातील हळदीचे क्षेत्र वाढले आणि सांगली जिल्ह्यातील हळदीच्या क्षेत्रात घट होत गेली. मराठवाड्यातील अत्यल्प पावसामुळे केवळ पावसावर येणाऱ्या पिकांवर शेतकरी अवलंबून असतात. हळद हे पावसाच्या पाण्यावर आणि हिवाळ्यातील २ पाण्यावर येणारे पीक असल्यामुळे हिंगोली, परभणी, सेलू, वसमत आणि आजूबाजूच्या परिसरात हळदीची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली.

एकरी २५ ते ३० क्विंटल हळदीचे उत्पादन होत असल्यामुळे शेतकऱ्यांना ऊस किंवा इतर पिकांच्या तुलनेत हळदीमध्ये चांगला नफा मिळू लागला. पण सांगली जिल्ह्यातील हळदीचे उत्पादन एकरी ३० ते ३५ क्विंटल असूनही पाण्याच्या उपलब्धतेमुळे येथील शेतकरी ऊस पिकांकडे वळाले आहेत. व्यापाऱ्यांच्या मतानुसार सांगलीत आता केवळ १० ते १२ लाख पोत्यांचे उत्पादन होत असून मराठवाड्यातील हळद ही ४० ते ५० लाख पोत्यांवर पोहचली आहे. 

हळदीचे दर का वाढले?
आयुर्वेदिक किंवा घरगुती उपायांसाठी हळदीचे महत्त्व खूप आहे. त्यातच कोरोनानंतर लोक आरोग्याकडे लक्ष देऊ लागल्याने हळदीचा आहारातील वापर आणि दैनंदिन सेवन वाढले आणि जागतिक स्तरावर हळदीची मागणी वाढली. त्यामुळे ५ ते ६ हजारांच्या आसपास असलेले दर १५ ते १७ हजारापर्यंत पोहोचले. सध्या हे दर ११ ते १४ हजारांच्या दरम्यान आहेत.

परिणामी देशात नैसर्गिक आपत्तीमुळे हळदीचे उत्पादन कमी-जास्त होत आहे. २०२४-२५ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत २० हजार टनांनी उत्पादन घटले आहे. यंदा (२०२५-२६) मान्सूनच्या लवकर झालेल्या आगमनामुळे हळदीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होण्याची शक्यता आहे. 

दर वाढल्याचा फायदा कुणाला?
हळद खरेदीसाठी अनेकदा व्यापारी लॉबींकडून शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जातो. निवडक मालाला जास्त दर मिळाल्याची अफवा पसरवून शेतकऱ्यांना मार्केटमध्ये माल घेऊन येण्यास भाग पाडले जाते. अनेक व्यापारी आपल्याकडील हळद साठवून ठेवतात आणि दर वाढल्यावरच बाहेर काढतात, याचा अप्रत्यक्ष फटका शेतकऱ्यांना बसतो. एकरी जवळपास १ लाख ५० हजार ते १ लाख ८० हजार रूपयापर्यंत उत्पादन खर्च येतो. त्यातुलनेत दर हे १५ हजारांच्या वर असायला पाहिजेत असे मत शेतकऱ्यांचे आहे.

सांगलीचे केंद्र वसमतला
वाढते तापमान, संततधार पाऊस, करपा व कंदकुज रोगाचा प्रादुर्भाव आदी कारणांमुळे सांगलीतील हळदीचे उत्पादन कमी होत आहे. सांगलीच्या तुलनेत वसमत बाजारात हळदीच्या उलाढाल वाढल्यामुळे सांगलीतील जवळपास ३० टक्के व्यापाऱ्यांनी वसमत येथूनच व्यापार सुरू केला आहे. 

महाराष्ट्रातील हळदीचे क्षेत्र व उत्पादन
वर्ष - हळदीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये) - हळदीचे उत्पादन (मे. टनांमध्ये)

२०२०-२१ = ५९५७६ - २३०७४१
२०२१-२२= १०२६६९ - ३६७८४२
२०२२-२३ = ८८३१८ - ३२३२१५
२०२३-२४= ८५१४८ - ३१००१३
२०२४-२५* = ७७९९२ - २९०१३७

देशातून झालेली हळदीची निर्यात
वर्ष - निर्यात (टनात) - उलाढाल (कोटीत)

२०१९-२० = १३७६५० - १२८६
२०२०-२१ = १८३८६८ - १७२२
२०२१-२२ = १५२७५८ - १५३४
२०२२-२३ = १७००८५ - १६६६
२०२३-२४ = १६२०१९ - १८७५.८६
२०२४-२५ = १७६३२५ - २८८५.३९

जागतिक उत्पादनात हळदीचा वाटा
देश - टक्केवारी

भारत - ७८
चीन - ८
म्यानमार - ४
नायजेरिया - ३
बांग्लादेश - ३
इतर - ४

राज्यातील जिल्हानिहाय हळद उत्पादन
महाराष्ट्रातील हळद पिकाखालील जिल्हानिहाय क्षेत्र

जिल्हा - क्षेत्र (हे.) - उत्पादन (मे. टन)
सातारा - ९९४.५२ - १६०५८.०६
सांगली - ११०१७.५४ - १३६७२७.६७
नांदेड - ३१२७.९९ - ३८५५५.३६
परभणी - २१७५६.३३ - १९२५४३.५२
हिंगोली - ६१०२८.७१ - ७७८४६०.३१
लातूर - ८१७.७७ - ६९४५.३६
उस्मानाबाद - ६७६.५७ - ५४३९.३१
यवतमाळ - ९६६.४३ - ८३७८.९४
चंद्रपुर - ६३९.६७ - ५४९४.७६
नागपूर - ३५४.६९ - ३१३२.०१
बुलढाणा - ४२५.८९ - ४७०३.४७
इतर - ३६७२.६३ - ३८९१७.२३
महाराष्ट्र - १,०५,४७८.७४ - १९,७५,३५६

Web Title: Turmeric production in Marathwada has increased! How much does it benefit farmers?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.