Join us

अतिवृष्टीचा फटक्याने ३५ हजार हेक्टरवरील हळद पीक धोक्यात; कंदकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 09:51 IST

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने २ लाख ७१ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यासोबतच ३५ हजार हेक्टरवरील हळद पिकांनाही फटका बसला आहे. करपा व कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवत असून, शेतकरी बुरशीनाशकाची फवारणी करीत आहेत.

बालय्या स्वामी 

हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने २ लाख ७१ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. यासोबतच ३५ हजार हेक्टरवरील हळद पिकांनाही फटका बसला आहे. करपा व कंदकूज रोगाचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवत असून, शेतकरी बुरशीनाशकाची फवारणी करीत आहेत. जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या काळात सरासरी ७९५ मिलिमीटर पाऊस होतो. प्रत्यक्षात आतापर्यंत ११२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सप्टेंबर महिन्यात तर पावसाने कहरच केला. या महिन्यात तब्बल २६१.७ टक्के पाऊस झाला. अतिवृष्टीने तब्बल २ लाख ७१ हजार हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, नगदी पीक म्हणून ओळखले जाणाऱ्या हळद पिकालाही फटका बसला आहे. यंदा तब्बल ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर हळद लागवड झाली आहे.

मात्र, अतिवृष्टीने ३० दिवसांपैकी १८ दिवस पीक पाण्यात होते. नदी, ओढ्याकाठच्या पिकातील पाण्याचा अजूनही पूर्णतः निचरा झाला नाही. परिणामी, कंदकूज, करपा रोगाचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी दिसून येत आहे. पीक वाचविण्यासाठी शेतकरी विविध उपाययोजना करीत आहेत.

३५३८४ हेक्टरवर हळद पिकाची लागवड

वसमत येथे बाळासाहेब ठाकरे हळद (हरिद्रा) संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन झाले आहे. या केंद्रातून हळद पिकासंदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात असून, हिंगोली व वसमत येथे हळदीची मोठी बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे यंदा तब्बल ३५ हजार ३८४ हेक्टर क्षेत्रावर हळदीची लागवड झाली आहे. मात्र, अतिवृष्टीने या पिकालाही झळ बसली असून, उत्पादनावर परिणाम होतो की काय? याची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.

तालुकानिहाय हळद पिकाचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका क्षेत्र 
हिंगोली ७,२२२ 
कळमनुरी ५,३५४ 
वसमत ११,१३१ 
औंढा नागनाथ ५,९८० 
सेनगाव ५,६९७ 

वसमत तालुक्यातील कौठा शिवारात अतिवृष्टीने हळद पिकात पाणी साचले आहे. त्यामुळे हु त्यामुळे हुमणी अळीसह करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. - रामदास ज्ञानदेव खराटे, शेतकरी, कौठा.

हळद पिकातील पाण्याचा निचरा करून उघड्या कंदावर मातीची भर द्यावी. संभाव्य करपा व कंदकूज रोगाच्या नियंत्रणासाठी कृषितज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी. अधिक माहितीसाठी कृषी विज्ञान केंद्राशी संपर्क साधावा. - प्रा. अनिल ओळंबे, उद्यान विद्यातज्ज्ञ.

हेही वाचा : उत्पादनशून्य जनावरांपासून यशस्वी उदरनिर्वाह; बीडच्या उमा ताईंची गोसेवेतील प्रेरणादायी वाटचाल

टॅग्स :पीकहिंगोलीशेतीशेतकरीपीक व्यवस्थापनशेती क्षेत्रपाऊस