Pune : हमीभावाने तूर खरेदीसाठी दिनांक २४ जानेवारी २०२५ पासून पुढे ३० दिवसांपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते. तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता हमी भावाने तूर खरेदीच्या नोंदणीची मुदत पुन्हा वाढवण्यात आली आहे. यामुळे तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून ही मुदतवाढ आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.
दरम्यान, २४ फेब्रुवारी २०२५ अखेर राज्यात २९ हजार २५४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून १६१ शेतकऱ्यांकडून १८१३.८६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. २४ जानेवारी रोजी दिलेली मुदतवाढ २४ फेब्रुवारी रोजी संपली असून ही मुदवाढ आणखी एका महिन्यापर्यंत वाढवण्यात आली आहे. यानुसार २४ मार्चपर्यंत शेतकऱ्यांना हमीभावाने तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे.
तूर खरेदीसाठी राज्यभरात जवळपास नाफेड चे ३७३ व एनसीसीएफ १२५ असे एकूण ४९८ केंद्र सुरू झाले आहेत. खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करण्याच्या संदर्भात निर्देश दिले असल्याची माहिती पणनमंत्र्यांनी दिली.
तसेच, नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 'नाफेड' अंतर्गत महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन, तसेच विदर्भ मार्केटींग फेडरेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याठिकाणी डेटा एन्ट्री व्यवस्था शेतकऱ्यांच्या प्रतिसादानुसार आवश्यक प्रमाणात ठेवण्यात येणार आहे.