Lokmat Agro >शेतशिवार > टोमॅटो पिकाची करावी लागते राखण

टोमॅटो पिकाची करावी लागते राखण

Tomato crop has to be maintained | टोमॅटो पिकाची करावी लागते राखण

टोमॅटो पिकाची करावी लागते राखण

चोरीचे प्रकार वाढले लाखमोलाच्या टोमॅटोमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली

चोरीचे प्रकार वाढले लाखमोलाच्या टोमॅटोमुळे शेतकऱ्यांची झोप उडाली

शेअर :

Join us
Join usNext

टोमॅटो पिकाला आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळत असून एक कॅरेट तब्बल ३५०० रुपयांपर्यंत विकले गेले आहे. आंबेगाव तालुक्यात टोमॅटोचे लागवड क्षेत्र खूपच कमी आहे. मात्र, ज्यांची बाग तोडणीसाठी आली आहे त्यांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. टोमॅटो चोरीचे प्रकार वाढल्याने बिबट्याची भीती असूनही डोळ्यात तेल घालून रात्रीच्यावेळी टोमॅटो बागांची राखण शेतकरी करत आहेत.

एकेकाळी आंबेगाव तालुका हा टोमॅटो उत्पादनासाठी राज्यात प्रसिद्ध होता. मात्र, वाढलेला भांडवली खर्च, लहरी हवामान, बाजारभावातील अनिश्चितता यामुळे दिवसेंदिवस लागवड क्षेत्र कमी होत आहे. घोडनदीकाठच्या गावामध्ये पाणी उपलब्ध असल्याने टोमॅटोची लवकर लागवड केली जाते. हे टोमॅटो जून, जुलै महिन्यात बाजारात विक्रीसाठी येतात. त्यांना चांगला बाजारभाव मिळतो.

यावर्षी वातावरणातील वाढती उष्णता तसेच रोगराईचा प्रादुर्भाव होत असूनही मोठ्या कष्टाने टोमॅटो पीक घेतले गेले. सुरुवातीला टोमॅटोचे बाजारभाव ढासळले होते. साधा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याने शेतकऱ्यांना अक्षरश: टोमॅटो फेकून द्यावे लागले.

बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांनी तोडणी न करता बागा सोडून दिल्या. नंतर लागवड क्षेत्र घटले. फार कमी टोमॅटो बागा आंबेगाव तालुक्यात शिल्लक राहिल्या आणि अचानक बाजारभाव कडाडले. त्यामुळे टोमॅटोने शेतकऱ्यांना मालामाल केले आहे.

चोरीच्या घटनांमुळे वाढली शेतकऱ्यांची डोकेदुखी

  • यापूर्वी कॅरेटला १५०० ते २००० पर्यंत बाजारभाव मिळाला होता. मात्र, हे बाजारभाव केवळ एक-दोन दिवस मिळाले. यावर्षी मात्र टोमॅटोच्या बाजारभावाने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
     
  • एक कॅरेट तब्बल ३५०० रुपये या उच्चांकी भावाने विकले गेले आहे. भुगी, बदला टोमॅटोला एक हजार पेक्षा जास्त भाव कॅरेटला मिळतोय. शेतकऱ्यांना एकरी दीड लाख रुपयांपर्यंत भांडवली खर्च आला आहे.
     
  •  नर्सरीतील तयार रोपांची लागवड केली जाते. या पिकासाठी त्यांनी काळजीपूर्वक लक्ष दिले असून मल्चिंग पेपरचा वापर, वेळोवेळी फवारणी केली. मात्र, वाढते तापमान व उशिरा आलेला पाऊस यामुळे फळधारणा कमी झाली आहे.
     
  • मागील वीस ते पंचवीस दिवस पावसाचे वातावरण असल्याने सूर्यदर्शन कमी वेळा झाले. त्याचा परिणाम फळधारणेवर झाला आहे. आता शेतकरी राहिलेल्या टोमॅटो पिकाची विशेष काळजी घेऊ लागला आहेत.
     
  • नैसर्गिक आपत्तीबरोबर चोरीच्या घटना शेतकयांसाठी डोकेदुखी ठरू लागल्या आहेत. रात्रीतून शेतातील टोमॅटो चोरीला जात आहेत. दहा कॅरेट चोरीला गेले तरी तीस हजार रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसतो.
     
  • बिबट्याची भीती रात्रभर शेतात डोळ्यात तेल घालून राखण करावी लागत आहे. ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो बागा टिकवून ठेवल्या आहेत त्यांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. भांडवली खर्चात यावर्षी अजून वाढ होऊन तो दीड पावणेदोन लाखांपर्यंत गेला आहे. उगाळ वातावरणामुळे बुरशीजन्य व जिवाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच वातावरणातील बदलांमुळे व सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे उत्पादनात घट येत आहे. त्याबाबत शेतकऱ्यांनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्वरित उपाययोजना करावी. बाजारभाव वाढले असल्याने बहुतेक शेतकऱ्यांचा कल नवीन लागवडीकडे आहे. टोमॅटोची लागवड करताना पुढील बाजारभावाचा अंदाज़ घ्यावा असा सल्ला मंचर येथील महेश मोरे यांनी दिला आहे.
     
  • श्री क्षेत्र वडगाव काशिबेग येथील महिला शेतकरी वैशाली मारुती पिंगळे यांनी २५०० टोमॅटो रोपांची लागवड केली. त्यासाठी त्यांना एक लाख ७० हजार रुपये भांडवली खर्च आला आहे. बाजारभाव वाढले असतानाच टोमॅटोचे उत्पादन सुरु झाले असून बुधवारी २५ कॅरेट टोमॅटोला तब्बल २५०० रुपये प्रति कॅरेट असा भाव मिळाला आहे. पहिल्यांदाच इतका बाजारभाव मिळाला असून अजून २०० कॅरेट उत्पादन निघेल. पती-पत्नी तसेच दोन्ही मुले मिळून शेतात टोमॅटो पिकाची काळजी घेत असल्याचे शेतकरी वैशाली मारुती पिंगळे यांनी सांगितले.

Web Title: Tomato crop has to be maintained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.