बार्शी : यवतमाळहून मार्गक्रमण करत करत बार्शी तालुक्यात दाखल झालेल्या वाघामुळे सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः बार्शी तालुक्यातील वनविभाग सतर्क झाला आहे.
वाघ हा पांगरी भागात म्हणजे उत्तर बार्शीचे बालाघाट डोंगररांगांच्या भागात असू शकतो. प्राण्यांवर हल्ला करत असलेल्या वाघ यापुढे माणसांवर हल्ला करून जीवितहानी होऊ नये आणि तो वाघ नरभक्षक होऊ नये.
यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाच्यावतीने शेतीसाठी रात्री सोडण्यात येणारी लाईट दिवसा सोडावी, असे पत्र महावितरण कार्यालयाला दिले असल्याची माहिती बार्शीच्या वन परिक्षेत्र अधिकारी अलका करे यांनी दिली.
वाघाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वनविभागाची पथके कार्यरत केली आहेत. हा वाघ बार्शी आणि आसपासच्या गावातच असण्याची शक्यता आहे.
सध्या ऊस लागवड तसेच गहू, ज्वारी, हरभरा, कांदा आदी पिकांना पाणी देण्याची कामे शेतात सुरू आहेत. त्यात महावितरण काढून रात्री लाईट सोडली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी जीव धोक्यात घालून रानात जावे लागते.
किमान पांगरी, उपळाई, आगळगाव भागात दिवसा आणि वैराग भागात रात्री असे तरी लाईटचे नियोजन करावे, अशी मागणी कांदलगाव आणि मांडेगावचे सरपंच अनुक्रमे प्रदीप नवले आणि पंडित मिरगणे यांनी केली आहे.
हल्ला सारखाच पण वाघाची ताकद जास्त▪️जिल्ह्यात बिबट्या अनेकदा दिसला. आता पहिल्यांदाच वाघ आढळला आहे. वाघ आणि बिबट्याच्या हल्ला करण्याच्या पद्धतीत सारखेपणा आहे.▪️दोघेही दबा धरून हल्ला करताना मानेला पकडतात. मात्र, वाघाची ताकद ही बिबट्यापेक्षा जास्त असते.▪️वाघ बिबट्यापेक्षा मोठा असतो. बिबट्याच्या अंगावर ठिपके तर वाघाच्या अंगावर पट्टे असतात.▪️बिबट्याचा रंग पिवळसर तर वाघाचा केशरी रंग असतो. वाघ उंची आणि लांबीत मोठा असतो.▪️बिबट्याला झाडावर चढता येते तर वाघाला येत नाही, अशी माहिती वन्यजीव अभ्यासक प्रसाद बोलदे यांनी दिली.
अशी घ्या काळजी१) रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर पडणे टाळा.२) जंगली श्वापदे रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय असतात.३) पाळीव प्राण्यांना बंदिस्त आणि सुरक्षित जागी ठेवा.४) रात्रीच्या वेळी दरवाजे व्यवस्थितरीत्या लॉक लावून बंद करा तसेच अंगणात किंवा घराच्या बाहेर उघड्यावर झोपणे टाळा.५) रात्री एकटे पायी फिरताना जवळ टॉर्च व काठी बाळगा. मोठ्याने म्युझिक लावा.६) घराजवळ रात्रीच्या वेळी मोठे लाईट लावा. घराच्या आसपास झाडेझुडपे असल्यास तो परिसर स्वच्छ ठेवा.७) घरातल्या कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करा. न केल्यास भटक्या कुत्र्यांची संख्या वाढते आणि त्याकडे जंगली प्राणी आकर्षित होतो.
वाघ आता नेमका कुठे आहे हे सांगणे कठीण आहे. वाघ सोलापुरातील परिसरापेक्षा धाराशिव जिल्ह्यातील परिसरात जास्त असण्याची शक्यता आहे. काळजी म्हणून वाघाचा धोका असलेल्या ठिकाणी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. पुण्यातील रेस्क्यूची टीमने बचावासाठी काळजी कशी घ्यावी याचे प्रशिक्षण दिले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. - कुशाग्र पाठक, उप वनसंरक्षक, वन विभाग
अचानक वाघ किवा बिबट्या जवळ दिसल्यास शांत राहण्याचा प्रयत्न करा. वाघ किवा बिबट्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या. त्याला डिवचण्याचा प्रयल बिलकूल करू नका. नागरिकांनी शांतता पाळावी, अफवा पसरवू नयेत. किंवा वनविभागाला सतत फोन करून हैराण करू नये, काळजी घ्या पण सतर्क राहा. गावोगावी तरुणांचे ग्रुप तयार करा आणि वनविभागाला सहकार्य करा. - अलका करे, वन परिक्षेत्र अधिकार