जालना जिल्ह्याच्या भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, बरंजला आणि जवखेडा ठोंबरे परिसरातील सुमारे १२५ शेतकऱ्यांची १ कोटी २३ लाख २६ हजार ११७ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोकरदन पोलिसांनी गुरुवारी रात्री तीन आरोपींना केली आहे. अटक न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, दोन आरोपी फरार आहेत.
जवखेडा ठोंबरे येथील केवट कृषी सेवा केंद्राचे मालक पवन भगवान बिलघे व इतर चार आरोपींनी जून २०२४ ते मे २०२५ या कालावधीत १२१ क्विंटल मका आणि इतर शेतमाल खरेदी करून शेतकऱ्यांना पैसे न देता फसवणूक केली. तसेच आरोपीने कोरे धनादेश देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल केली.
शेतकरी पैसे मागण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. बरंजळा लोखंडे येथील श्रीमंत हिंमतराव लोखंडे यांच्या तक्रारीवरून पवन भगवान बिलघे, करण भगवान बिलघे, भगवान बिलघे, प्रद्युम भगवान बिलघे यांच्यासह एक महिला (सर्व रा. जवखेडा ठोंबरे, ता. भोकरदन) यांच्याविरोधात भोकरदन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी करण बिलघे, महिला अद्याप फरार
• पोलिस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सागर शिंदे तपास करत आहेत.
• या प्रकरणात पवन बिलघे, भगवान बिलघे आणि प्रद्युम बिलधे या तिघांना गुरुवारी रात्री अटक करण्यात आली असून, त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
• आरोपी करण बिलघे व महिला अद्याप फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे.