बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे जळोची उपबाजार येथील निर्यात सुविधेवरून चालू हंगामातील पहिला कंटेनर लंडनकडे रवाना झाला. त्याचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती विश्वासराव आटोळे यांचे शुभहस्ते झेंडा दाखवून करण्यात आला.
सुविधेवरून सुरुवातीला पहिल्या कंटेनरमध्ये १० टन आंबालंडनकडे रवाना झाला. पणन मंडळाचे निर्यात सुविधा केंद्र असून सदर सुविधा केंद्र बारामती बाजार समिती सन २०१४ पासून चालवीत आहे. रेन्बो इंटरनॅशनल प्रा.लि., पुणे यांच्यामार्फत दरवर्षी आंबा निर्यात केला जातो. निर्यातदार यांच्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दूरदृष्टीने वर्ष २००७ मध्ये जळोची येथे निर्यात सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. त्याच धर्तीवर आता जळोची येथे आणखी मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत फळे व भाजीपाला हाताळणी केंद्र उभारणेत आले असून, सदर प्रकल्प लवकरच सुरू होत आहे.
त्या ठिकाणी नवीन निर्यातदार येणार असल्याने त्याचा उपयोग परिसरातील शेतकऱ्यांना होणार असल्याचे मत सभापती विश्वास आटोळे यांनी व्यक्त केले. सुरुवातीला पहिल्या कंटेनरमध्ये १० टन आंबा लंडनकडे रवाना झाला.
आंबा उत्पादक शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताचा वापर करून निर्यातक्षम दर्जाचे व रेसिड्यू फ्री उत्पादन करून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव अरविंद जगताप यांनी यावेळी केले आहे.
सध्या निर्यात सुरू झाली असल्याने लंडन येथे पहिला कंटेनर पाठवीत असून, पुढे ऑर्डरप्रमाणे वेगवेगळ्या देशांत निर्यात करण्याचा मानस आहे, असे अभिजित चंद्रकांत भसाळे यांनी सांगितले.
हेही वाचा : ऑनलाईन माहिती घेत रणजित करताहेत शेती; १० गुंठे क्षेत्रात झाली अडीच लाखांची पपई