Join us
Daily Top 2Weekly Top 5

Indrayani Rice : यंदा इंद्रायणी भाताच्या उताऱ्यात घट अन् दरात २५ टक्के वाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 15:27 IST

भात पीक फुलोऱ्यात असताना प्रमाणापेक्षा अवेळी जास्त पाऊस झाल्याने भात पीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना फुलारा झडून गेल्याने त्याचा परिणाम भात पिकाच्या उताऱ्यावर झाला.

भोर : तालुक्यात वीसगाव, आंबवडे, वेळवंड भुतोंडे व महुडे खोऱ्यात इंद्रायणी तांदळाच्या उताऱ्यात ३० टक्के घट झाली आहे. त्यामुळे यंदा बाजारात इंद्रायणी तांदूळ कमी होणार असल्याने तांदळाचे दर २५ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

भातपीक फुलोऱ्यात असताना प्रमाणापेक्षा अवेळी जास्त पाऊस झाल्याने भातपीक फुलोरा ते दाणे भरण्याच्या अवस्थेत असताना फुलारा झडून गेल्याने त्याचा परिणाम भात पिकाच्या उताऱ्यावर झाला.

तसेच अति पावसामुळे भाताच्या चौथ्याने दुबार फुटवा धरल्याने सुरुवातीचे पीक परिपक्व असून दुबार फुटवा पूर्ण हिरवागार तसेच अर्धवट पोषण झाल्याने भात पीक पंळजावर गेले आहे.

वातावरणातील बदलामुळे इंद्रायणी जातीच्या भात पिकावर तुडतुडे या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. शेतात ठिकठिकाणी तुडतुड्याने खोडातील अन्नरस शोषल्यामुळे करपून गेलेले गोलाकार भाताचे पीक दिसते.

त्या ठिकाणी भात पिकाच्या खोडावर असंख्य तुडतुडे आढळून येत आहे. त्यामुळे भातशेती संकटात आली आहे. यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती आहे.

अवेळी अतिरेकी पाऊस पडल्याने भात पीक तयार होण्यास विलंब झाल्याने १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधी उशिरा भात कापणी होत असल्याने रब्बीचा हंगाम लांबला आहे.

हरभरा, ज्वारी पिकांची पेरणी लांबणीवर पडल्याने या पिकांना पावसाअभावी फटका बसणार आहे. इंद्रायणी तांदळाच्या उत्पादनात ३० टक्क्यांपेक्षा जास्त घट झाल्याने इंद्रायणी तांदळाचे दर २५ टक्यांनी कडाडण्याची शक्यता आहे.

मादी तुडतुडे व त्यांची पिल्ले भाताच्या खोडातील अन्नरस शोषून घेतल्याने भाताची पाने पिवळी पडून रोपे पूर्ण वाळली आहेत. विशेषतः शेताच्या मध्यभागी ठिकठिकाणी तुडतुड्यांनी करपून गेलेले भाताचे पीक दिसून येत आहे, अशा रोपांमधून ओब्या बाहेर पडत नाहीत. जरी पडल्याच तरी दाणे पोचट होतात. त्यामुळे भात पंळजावर गेल्याने त्याचा परिणाम भाताचा उतारा कमी येऊन भाताचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे इंद्रायणी तांदळाचे दर २५ टक्क्यांनी वाढणार आहे. - अरविंद जाधव शेतकरी, रावडी

अधिक वाचा: Vij Bill Savlat : वीजबिलात सवलत हवी असेल तर हे करा मिळेल इतकी सूट

टॅग्स :भातपीकशेतकरीशेतीकाढणीपाऊस