Join us

Soybean Cultivation यावर्षी ६५ टक्के शेतकरी करणार घरच्या सोयाबीन बियाण्यांची पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 5:02 PM

बियाण्यांची टंचाई, दरही वाढले

अकोला जिल्ह्यात सध्या विविध बियाण्यांची टंचाई जाणवत असून, दरही भरमसाट वाढले आहेत. परंतु दर्जेदार बियाणे मिळावे, यासाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांच्या रांगा लागत आहेत.

तरीही अपेक्षित बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी घरचे बियाणे पेरणीचा पर्याय शोधला असून, दोन लाख क्विंटलवर हे घरचे बियाणे उपलब्ध असल्याचा दावा कृषी विभागाने केला आहे.

अकोला जिल्ह्यात यावर्षी दोन लाख ३५ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी होणार असल्याने कृषी विभागाने नियोजन केले आहे. यासाठीच्या बियाण्यांची तजवीज केली असून, टंचाई भासू नये यासाठीची काळजी कृषी विभागाने घेतली असली तरी विशिष्ट कंपनीच्याच बियाण्यांची मागणी होत असल्याने त्या बियाण्यांची टंचाई जाणवत आहे. सोयाबीन बियाण्यांचे दरही वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर घरचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी वापरण्याची तयारी शेतकऱ्यांनी सरू केली आहे.

उगवणक्षमता ८० ते ९० टक्के

घरच्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ८० ते ९० टक्के आहे. तरीही शंका असल्यास पेरणीपूर्वी १०० बियाणे ओल्या गोणीत ठेवून पाच ते सात दिवसांनी त्यातील किती बियाणे उगवतात हे बघावे. १०० पैकी ९० बियाणे उगवले तर उत्तम आहे. त्यापेक्षा कमी बियाणे उगवल्यास शेतकऱ्यांनी अतिरिक्त्त बियाणे पेरणी करावी. म्हणजे अपेक्षित पेरणी होऊन उत्पादनही चांगले होईल.

बियाण्यांचे जतन करावे

यावर्षी उत्पादन घेतल्यास ते बियाणे तीन वर्षे पेरणी करता येत असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणांचे जतन करावे. एका वर्षी गावातील काही शेतकऱ्यांनी तर दुसऱ्या वर्षी आणखी काही शेतकऱ्यांनी बियाणे संगळून ठेवल्यास टंचाई भासणार नाही.

दोन लाख क्विंटलवर बियाणे उपलब्ध

• शेतात पेरणी केलेले बियाणे सलग तीन वर्ष वापरता येत असल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी घरचेच बियाणे पेरणी करण्याची तयारी सुरू केली आहे.

• याकरिता बियाण्याची साफसफाई करण्यात येत आहे.

• बियाणे बाजार व शेतकऱ्यांकडील असे दोन लाख क्विंटलवर हे बियाणे उपलब्ध आहे.

६५ टक्के बियाणे वापरणार

यावर्षी ६५ टक्के घरचे बियाणे पेरणीचे कृषी विभागाने नियोजन केले असून, त्यासाठीचे मार्गदर्शनही शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. यामुळे शेतकरी सकारात्मक असल्याचे जिल्ह्यातील चित्र असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे.

दर ५० रुपये किलोच्या आत

बाजारात सध्या ३० सोयाबीन बियाणे गोणीचे दर १,९०० ते २,००० हजार रुपये असून, घरच्या बियाण्यांचे दर हे प्रतिकिलो ४५ ते ५० रुपये आहेत. यामुळे हे दर शेतकऱ्यांना परवडणारे असल्याचे कृषी विभाग सांगत आहे.

यावर्षी ६५ टक्के घरचे बियाणे पेरणी यावर्षी केली जाणार आहे. यासाठीचे मार्गदर्शनही शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. बियाण्यांचे दर वाढल्याने घरच्या सोयाबीन बियाणे पेरणीवर शेतकऱ्यांचा कल आहे. बियाण्यांची उगवणक्षमता बघून पेरणी करणे अपेक्षित आहे. - शंकर किरवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अकोला.

हेही वाचा - Goat Farming अवकाळी संकटाच्या शेतीला देईल आधार; शेळी पालन हक्काचा रोजगार

टॅग्स :सोयाबीनपीक व्यवस्थापनशेतीशेतकरीखरीपशेती क्षेत्रलागवड, मशागत