Join us
Daily Top 2Weekly Top 5

मार्चमध्ये तुटणाऱ्या उसाला 'हा' साखर कारखाना देणार टनाला ३ हजार ५०० रुपये पहिली उचल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 16:13 IST

फेब्रुवारीमध्ये तोडल्या जाणाऱ्या उसासाठी टनाला १०० रुपये आणि मार्चमध्ये तोडल्या जाणाऱ्या उसासाठी टनाला २०० रुपये अधिकचे अनुदान दिले जाणार आहे.

सोमेश्वरनगर : सोमेश्वर साखर कारखान्याने पहिली उचल एकरकमी ३३०० रुपये प्रतिटन जाहीर केली आहे.

फेब्रुवारीमध्ये तोडल्या जाणाऱ्या उसासाठी टनाला १०० रुपये आणि मार्चमध्ये तोडल्या जाणाऱ्या उसासाठी टनाला २०० रुपये अधिकचे अनुदान दिले जाणार आहे.

त्यामुळे १ मार्चपासून तोडला जाणारा ऊस सभासदांच्या खात्यात ३५०० रुपये प्रति टन या दराने वर्ग करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, अनेक कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत.

जिल्ह्यात सोमेश्वर, माळेगाव आणि भीमा पाटस हे तीनच साखर कारखाने सध्या गाळप हंगाम सुरू असून, २० ते २५ मार्चच्या सुमारास हे तिन्ही कारखाने आपला गाळप हंगाम बंद करू शकतात.

उसाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असले तरी साखर कारखान्यांची वाढलेली दैनंदिन गाळप क्षमता हंगाम लवकर संपवण्यास मदत करीत आहे.

ऊस तुटणीच्या काळातही सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने या हंगामात १३.५ ते १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

आजपर्यंत ११ लाख ३५ हजार मेट्रिक टन ऊस गाळप करून १३ लाख ३१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे, तसेच ११.७९ या जिल्ह्यातील सर्वाधिक साखर उतारा राखत आघाडी घेतली आहे.

सोमेश्वर कारखान्याने आतापर्यंत १२० दिवसांत दैनंदिन साडे नऊ हजार टन या उच्च क्षमतेने ११ लाख टन ऊस गाळप केले आहे. दैनंदिन साखर उतारा तेरा टक्के आहे.

त्यामुळे अंतिम सरासरी उतारा बारा टक्क्यांपेक्षा जास्त राहील. हंगामाच्या सुरुवातीसच सोमेश्वरने १३.५ ते १४ लाख टन गाळप करण्याचा मनोदय व्यक्त केला होता.

१३.५ लाख टन गाळपअपवाद वगळता सभासदांनी अन्य कारखान्यांना ऊस न दिल्याने, कारखाना मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू राहील आणि १३.५ लाख टन गाळप पूर्ण होईल, असा अंदाज आहे. सध्याच्या गाळपात सोमेश्वर जिल्ह्यात तिसरा, तर राज्यात आठवा आहे.

अधिक वाचा: मनाप्रमाणे जास्त क्षमतेचा सोलार प्रकल्प बसविण्याचा मार्ग झाला बंद; आता 'हा' नवा नियम लागू

टॅग्स :साखर कारखानेऊसशेतकरीपुणेकाढणीमालेगांव