Join us

सौर कृषी पंपाच्या अडचणी संदर्भात तक्रार करण्यासाठी आला हा नवीन पर्याय; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 09:31 IST

Solar Pump Complaint राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले असून, सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाइल अॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

पुणे : राज्यात विविध योजनांमध्ये ५ लाख ६५ हजार सौर कृषी पंप बसविण्यात आले असून, सौर पंप बसविल्यानंतर त्यातील बिघाडाबाबतच्या तक्रारी मोबाइल अॅपवरूनही नोंदविण्याची सुविधा महावितरणने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली आहे.

महावितरणने लाभार्थी शेतकऱ्यांना सौर कृषी पंप बिघडल्यास तक्रार करण्यासाठी यापूर्वी वेबसाईटवरून तक्रार करणे, संबंधित पुरवठादार कंपनीच्या वेबसाईटवर तक्रार करणे.

तसेच महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करून तक्रार करणे असे तीन पर्याय उपलब्ध करून दिले होते. आता मोबाइलवरील महावितरणच्या अॅपद्वारे तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

महावितरणचे मोबाइल अॅप लोकप्रिय ठरले असून, वीज ग्राहक त्याचा वापर आपले वीज बिल जाणून घेणे, बिल भरणे यासह मीटर रीडिंग नोंदणी, वीज चोरी कळविणे, नादुरुस्त ट्रान्स्फॉर्मरची माहिती कळविणे अशा विविध कामांसाठी करत आहेत.

त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांना या मोबाइल अॅपमध्ये 'सौर पंप तक्रार' यावर क्लिक करून सौर कृषी पंपाविषयी तक्रार दाखल करता येईल. तक्रार नोंदविताना शेतकऱ्याने सौर कृषी पंपाचा लाभार्थी क्रमांक किंवा नोंदणीकृत मोबाइल क्रमांक लिहिणे गरजेचे आहे.

सौर कृषी पंप बसविल्यानंतर पंप चालत नसणे, सौर पॅनलची नासधूस होणे, सौरऊर्जा संच काम करत नसणे, सौर पॅनल्सची किंवा पंपाची चोरी होणे अथवा पंपातून कमी दाबाने पाणी येणे अशा विविध तक्रारी शेतकरी करू शकतील.

सौर कृषी पंप संचाचा विमा उतरविण्यात आला आहे. शेतात सौर कृषी पंप बसविल्यानंतर पाच वर्षे त्याची देखभाल दुरुस्ती करण्याची जबाबदारी संबंधित पुरवठादार कंपनीवर आहे.

शेतकऱ्यांनी तक्रार नोंदविल्यानंतर तीन दिवसांत तक्रारीचे निवारण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व कंत्राटदारांना त्यांनी ज्या जिल्ह्यात पंप बसविले आहेत, त्या जिल्ह्याच्या ठिकाणी सेवा केंद्र उभारणे बंधनकारक करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारीचे निराकरण झाल्यावर त्यांना मोबाइलवर संदेश मिळेल. प्रत्येक मंडलाच्या अधीक्षक अभियंत्यांची देखरेख राहील.

अधिक वाचा: शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात?

टॅग्स :शेतकरीशेतीपाणीवीजमहावितरणमोबाइलऑनलाइन