Join us
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या हवामानात व खडकाळ जमिनीवर तग धरणारे 'हे' भरडधान्य पिक शेतकऱ्यांना देतंय आर्थिक स्थैर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 13:23 IST

चांगली मागणी, उत्तम भाव, अशा उत्पादन खर्च कमी, कसल्याही प्रतीच्या जमिनीवर घेता येणारे, भरघोस उत्पन्न, आरोग्यासाठी लाभदायक वैशिष्ट्यांमुळे भरडधान्य पिकांना वेगळे महत्त्व आहे.

चांगली मागणी, उत्तम भाव, अशा उत्पादन खर्च कमी, कसल्याही प्रतीच्या जमिनीवर घेता येणारे, भरघोस उत्पन्न, आरोग्यासाठी लाभदायक वैशिष्ट्यांमुळे नाचणी पिकाला वेगळे महत्त्व आहे.

पनवेल तालुक्यात दिवसेंदिवस शेती नष्ट होत चालली असली तरी काही भागांत शेतकऱ्यांकडून नाचणी शेतीचे पीक घेतले जाते.

कृषी विभागाकडूनही याकरिता प्रोत्साहन दिले जाते. कमी पावसात, हलक्या जमिनीत तसेच डोंगराळ भागातही तग धरणारे नाचणी हे महत्त्वाचे पीक आहे.

पनवेल तालुक्यामध्ये मुख्यतः मालढुंगे, धोदाणी, पोसरी, तामसई, माडभुवन व माचीप्रबळ या गावांमध्ये नाचणी पीक घेतले जाते. पनवेल तालुक्यात साधारणतः ७० हेक्टर क्षेत्रावर लागवड केली जाते.

नाचणी पिकावर रोग अथवा किडीचा प्रादुर्भाव होत नाही. इतर पिकांच्या तुलनेत ही सर्वात महत्त्वाची बाब असल्याने नाचणीला काही शेतकरी प्राधान्य देतात.

तसेच या पिकाला वरखताची जास्त आवश्यकता नाही. पौष्टिक गुणधर्म असल्याने नाचणीला मागणी वाढली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ होत आहे.

प्रतिक्विंटल मिळतो ४,८८६ रुपये भाव◼️ नाचणीला प्रतिक्विंटल ४,८८६ एवढा भाव आहे.◼️ प्रथिने, लोह, कॅल्शियम व मँगनीज समृद्ध असे हे नाचणी पीक आहे.◼️ नाचणीची पेरणी १५ जून ते १५ जुलैपर्यंत केली जाते.

तग धरण्याचे गुणधर्म◼️ नाचणीचा आकार इतर धान्याच्या तुलनेत लहान असून हे एकदलवर्गीय पीक आहे.◼️ या पिकामध्ये स्वपरागीभवन प्रक्रियेद्वारे बीजनिर्मिती होते.◼️ सर्वच भरड धान्य पिके ही बदलत्या हवामानास अनुकूल पिके आहेत.◼️ या पिकांमध्ये सी ४ पद्धतीने प्रकाश संश्लेषण होते.◼️ त्यामुळे पानाद्वारे अन्ननिर्मिती करताना प्रकाश, पाणी व कार्बनडाय ऑक्साइडचा सुयोग्य वापर या वनस्पतीमध्ये केला जातो.◼️ तसेच प्रतिकूल परिस्थितीत वाढीची उत्कृष्ट वैशिष्ट्ये जसे की, कमी उंची, पानांचा लहान आकार, कणीस व पाने यामध्ये अन्नपदार्थ पुरविण्यासाठी योग्य पद्धत, तंतूमय मुळांची खोल वाढ व व प्रतिकूल परिस्थितीत तग धरण्याचा गुणधर्म यामुळे या पिकांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे.

अधिक वाचा: रेशीम उद्योगासाठी मिळतंय आता ४ लाखांपर्यंत अनुदान; काय आहेत योजना? जाणून घ्या सविस्तर

टॅग्स :नाचणीपीकशेतकरीशेतीपनवेलकोकणहवामान अंदाज