कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याने हंगाम २०२४-२५ करिता ३३०० रुपये प्रतिटन ऊसदर जाहीर केला आहे.
चालू गळीत हंगामात नोव्हेंबर २०२४ अखेर गळितास आलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर मंगळवारी दि. ३१ डिसेंबर रोजी जमा केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली.
नरके म्हणाले, ३० नोव्हेंबर २०२४ अखेर १६ हजार ५६० मे. टन ऊस गळितास आला आहे. या उसाची जाहीर केलेल्या ३३०० रुपये प्रतिटनप्रमाणे एकूण ५ कोटी ४६ लाख ४८ हजार इतकी रक्कम संबंधित ऊसपुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केली आहे.
३० डिसेंबर २०२४ अखेर कारखान्याने १ लाख ६७ हजार २७० मे. टन ऊस गाळप करून १ लाख ८७ हजार २३० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे. सरासरी साखर उतारा ११.५० टक्के आहे.
कुंभी-कासारी कारखान्याचे ऊस गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सर्वी ऊस उत्पादक सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण पिकविलेला ऊस कारखान्यास पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष आमदार चंद्रदीप नरके यांनी केले.
यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे, सर्व संचालक मंडळ, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील व कामगार प्रतिनिधी उपस्थित होते.
अधिक वाचा: Sathekhat : साठेखत म्हणजे नक्की आहे तरी काय; का केले जाते साठेखत? पाहूया सविस्तर