अरुण बारसकरसोलापूर : कोणी चिक्कू तर कोणी नारळ, कोणी शेवगा तर कोणी ड्रॅगनफ्रूट मात्र अधिकाधिक केळी, आंबा, डाळिंब, पेरू व नारळ लागवडीला प्राधान्य दिले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षभरात तीन हजार हेक्टर क्षेत्रावर फळपीक लागवड झाली आहे. आता फळपिकांचे क्षेत्र एक लाख हेक्टरांवर पोहोचले आहे.
सोलापूर जिल्ह्यात वरचेवर कोरडवाहू क्षेत्राचे सिंचनखालील क्षेत्रात रूपांतर झपाट्याने वाढत आहे. चार पैसे हमखास मिळणारे पीक म्हणून उसाला शेतकरी प्राधान्य देत आहेत.
याशिवाय जिल्ह्यात साखर कारखान्यांची संख्या अधिक असल्याने ऊस गाळपासाठी अडचणी येत नाहीत. जिल्ह्यात उसाचे सर्वाधिक क्षेत्र असले तरी इतर फळपिकांनाही तेवढेच महत्त्व शेतकरी देत आहेत.
त्यामुळेच जिल्ह्यात फळपिकांचे क्षेत्र एक लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. त्यात प्रामुख्याने ऊस, केळी, डाळिंब, द्राक्ष, आंबा, पेरू आदींचा समावेश आहे.
साखर, डाळिंब उत्पादन व निर्यातीत महाराष्ट्रात सोलापूर जिल्हा राज्यातच नंबर १ आहे. त्यात आता गुणवत्तेच्या केळीचे जिल्ह्यात उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेताना दिसत आहे.
मागील आर्थिक वर्षात तीन हजार हेक्टर क्षेत्रावर फळपीक लागवड झाली आहे. त्यामध्ये केळी लागवड सर्वाधिक म्हणजे १५०२ हेक्टर तर आंबा ६६३ हेक्टर, डाळिंब ४०५ हेक्टर, पेरू ८२ हेक्टर, नारळ ६८ हेक्टर तसेच इतर फळपिकांचाही समावेश आहे.
जिल्ह्यात उसाचे क्षेत्र सर्वाधिक तर डाळिंब व केळीचे क्षेत्र तितकेच आहे. जिल्ह्यात सध्या उसाचे एक लाख ५७हजार हेक्टर क्षेत्र झाले आहे.
सर्वाधिक करमाळ्यात फळपीक लागवडयंदा तीन हजार हेक्टर क्षेत्रावर फळपीक लागवड झाली असून सर्वाधिक सहाशे हेक्टर करमाळ्यात व त्यातही ६३० हेक्टर केळीची लागवड झाली आहे. पंढरपूर तालुक्यात ५१८ हेक्टरवर फळपीक लागवड झाली त्यामध्ये केळी ३६४ हेक्टर, डाळिंब ८८ हेक्टर, मोहोळ तालुक्यात ४११ हेक्टर फळपीक लागवड यंदा झाली आहे.
ऊस, केळी अन् डाळिंबजिल्ह्यात डाळिंबाचे एकूण २८ हजार हेक्टर, द्राक्षाचे एकूण १९ हजार हेक्टर, केळीचे एकूण २२ हजार हेक्टर, पेरू ५ हजार तीनशे हेक्टर, आंबा साडेचार हजार हेक्टर, लिंबू ३ हजार २०० हेक्टर, सीताफळ साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावर आहे.
मागील वर्षात जिल्ह्यात अडीच हजार हेक्टर फळपीक लागवडीचे उद्दिष्ट होते. प्रत्यक्षात तीन हजार हेक्टर क्षेत्रावर फळपीक लागवड झाली आहे. करमाळा, पंढरपूर व मोहोळ तालुक्यात सर्वाधिक फळपिकांची लागवड झाली आहे. यावर्षी केळी लागवडीला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. - शुक्राचार्य भोसले, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी
अधिक वाचा: उसाचे पैसे न देणारे राज्यातील ३३ कारखाने साखर आयुक्तांच्या रडारवर; काय होणार कारवाई?