गेल्या सहा महिन्यांपासून मागील खरीप हंगामातील नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १५९ कोटी रुपयांची पीक विमा नुकसान भरपाई मिळाली आहे. जवळपास बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर ही भरपाईची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून यंदाच्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीला या मदतीने आणखी चालना मिळाली आहे.
पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेतून गेल्या हंगामात पुणे विभागाला २८३ कोटी रुपये मंजूर झाले होते. त्यानुसार या २८३ कोटींपैकी अहिल्यानगर जिल्ह्याला १५९ कोटी २१ लाख ५४ हजार ४२४ रुपये मंजूर केले होते. त्यात नेवासा तालुक्यातील ३१ हजार ४४ हेक्टर क्षेत्रावरील पिकाच्या नुकसानीपोटी ४४ हजार २४३ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ४६ कोटी ५२ लाख २१ हजार ३३८ रुपये मंजूर झाले होते. यातील नव्वद टक्के रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे.
जिल्ह्यातील पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात गेल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या ३ हजार ८४२ हेक्टर क्षेत्रावरील पिकाच्या नुकसानीपोटी ६ हजार ७५७ शेतकऱ्यांना १ कोटी ६२ लाख २७ हजार ५८४ रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्या व्यतिरिक्तही स्थानिक नैसर्गिक आपत्तीतूनही वरील दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत मिळाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक लाभ हा नेवासा तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळाला आहे.
तालुका : मिळालेली रक्कम
जामखेड - ७०४७६०५८
कर्जत - १४१८९०३३
पारनेर - ८०३५३२३
पाथर्डी - १३६९४०२७२
श्रीगोंदा - ६२६५५४३९
अकोले - ७७०१६१६
कोपरगाव - १०६२८०३१३
अहिल्यानगर - ४४७४१५७६
नेवासा - ४६५२२१३३८
राहाता - ७१३५६९०८
राहुरी - १७०४१२६९१
संगमनेर - १८१७५२२२
शेवगाव - ३१५३७८७७०
श्रीरामपूर - १००५८९८६४
नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना ४६ कोटींपेक्षा अधिक रकमेची पीक विमा नुकसान भरपाई मिळाली. बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा झाली आहे. उर्वरित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लवकरच पीकविमा कंपनीकडून नुकसान भरपाईची रक्कम जमा होईल. - धनंजय हिरवे, तालुका कृषी अधिकारी, नेवासा.
हेही वाचा : फवारणीपूर्वी तपासा पाण्याचा सामू; पीएच बरोबर नसेल तर महागडी फवारणी सुद्धा जाईल फेल