सोलापूर : जिल्ह्यातील अवघ्या ९ व धाराशिव जिल्ह्यातील चार, अशा १३ साखर कारखान्यांनी संपूर्ण ऊस उत्पादकांचे पूर्ण पैसे दिले असून, आजही दोन्ही जिल्ह्यांतील ३२ साखर कारखान्यांकडे ४९९ कोटी १४ लाख रुपये थकलेले आहेत.
उसाच्या पैशासाठी हेलपाटे मारून शेतकरी वैतागले असले तरी साखर कारखानदारांना घाम फुटेना झाला आहे. साखर आयुक्तांनी थकबाकी असलेल्या साखर कारखान्यांची सुनावणी घेतली असली तरी पुढील कारवाई झालेली नाही.
सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांतील ४५ साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामात साखर कारखाने सुरू केले होते. यंदा उसाचे क्षेत्र कमी असल्याने व असलेल्या उसाला उतारा कमी पडल्याने साखर कारखान्यांचे पट्टे लवकर पडले.
साखर कारखाने जरी बंद झाले असले तरी शेतकऱ्यांच्या उसाचे पैसे कारखान्यांनी थकविले आहेत. कारखाने बंद होऊन साधारण दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला असला तरीही साखर कारखानदार उसाच्या पैशाचे नाव घेत नाहीत.
शेतकरी उसाच्या पैशासाठी साखर कारखानदारांना भेटून विनंती करीत आहेत. मात्र, कारखान्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी वैतागून गेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील ३३ व धाराशिव जिल्ह्यातील १२ अशा ४५ साखर कारखान्यांनी सरलेल्या हंगामात गाळप केले आहे. त्यापैकी १३ साखर कारखान्यांनी एफआरपीची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.
एफआरपीची ६० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम देणाऱ्या १७ साखर कारखान्यांची सुनावणी १८ मार्च रोजी साखर आयुक्तांनी घेतली आहे.
यांच्याकडे थकली रक्कमसोलापूर जिल्ह्यातील २४ साखर कारखान्यांकडे ४११ कोटी ५२ लाख तर धाराशिव जिल्ह्यातील साखर १५ फेब्रुवारीच्या अहवालावरून सिद्धनाथ तिऱ्हे (३८ कोटी ३० लाख), इंद्रेश्वर शुगर (२२ कोटी ३५ लाख) यांच्याकडे सर्वाधिक थकबाकी आहे. सिद्धनाथ शुगरने ३७ टक्के तर इंद्रेश्वर शुगर ने ४५ टक्के रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. इतर साखर कारखान्यांकडे थकबाकी असली तरी ती ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे.
या कारखान्यांनी दिले संपूर्ण पैसेश्री. पांडुरंग श्रीपूर, सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील अकलूज, विठ्ठलराव शिंदे पिंपळनेर, विठ्ठलराव शिंदे करकंब, ओंकार शुगर (जुना शेतकरी चांदापुरी), ओंकार शुगर (जुना विठ्ठल कार्पोरेशन म्हैसगाव), व्ही. पी. शुगर अक्कलकोट, श्री. शंकर सहकारी शंकरनगर, येडेश्वरी खामगाव बार्शी तर धाराशिव जिल्ह्यातील कचेश्वर शुगर, आयान (बाणगंगा), नॅचरल शुगर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर या १३ साखर कारखान्यांनी १५ मार्चपर्यंत शेतकऱ्यांचे पैसे दिले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.
अधिक वाचा: गुळ व आधारित उत्पादनातून वाढविला शेतीचा गोडवा; खर्च वजा जाता पावणेतीन लाख रुपयांचा फायदा