Join us
Daily Top 2Weekly Top 5

उसाच्या वजनकाट्यात चोरी आता चालणार नाही; शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारखान्यांमध्ये पथकाची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2026 10:05 IST

साखर कारखान्यांवर गाळपासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात तफावत असल्याच्या तक्रारीनंतर साखर कारखान्यांच्या क्षेत्रात वजन काटे तपासणीसाठी वैधमापन शास्त्र विभाग कामाला लागला असून तपासण्या सुरू आहेत.

साखर कारखान्यांवर गाळपासाठी आलेल्या शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात तफावत असल्याच्या तक्रारीनंतर बीड जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या क्षेत्रात वजन काटे तपासणीसाठी वैधमापन शास्त्र विभाग कामाला लागला असून तपासण्या सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील सहकारी व खासगी ९ कारखान्यांचा २०२५-२६ चा साखर गाळप हंगाम सध्या सुरू आहे.

साखर कारखान्यात वापरात असलेल्या वजन काट्यांची पडताळणी व मुद्रांकन वैध मापनशास्त्र विभागाच्या निरीक्षकांनी केलेले म्हटले आहे. दरम्यान, शेतकऱ्यांचा ऊस कारखान्यात गेल्यानंतर वजन करताना तफावत आढळत असल्याच्या तक्रारी काही भागातून आल्यानंतर वैधमापन शास्त्र विभागाने मराठवाड्यातील कार्यालयांचे दूरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक तसेच प्रमुख अधिकाऱ्यांची नावे जारी केली आहेत. तफावत आढळल्यास या ठिकाणी तक्रारी करण्याचे आवाहन केले आहे.

वजनाबाबत खात्री करावी

नेमलेल्या पथकामार्फत वजन काटे तपासण्या सुरू आहेत. तरीदेखील उसाच्या वजनाबाबत शंका किंवा तक्रार असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी त्यांच्या वाहनाचे बाहेरील वजन काट्यावर वजन करून घ्यावे व त्याची रीतसर पावती घ्यावी.

या काट्यावरील वजन व साखर कारखाना परिसरातील वाहन काट्यावरील वजनात तफावत आढळून आल्यास छत्रपती संभाजीनगर विभागातील संबंधित जिल्ह्यातील वैध मापनशास्त्र कार्यालयाकडे तक्रार करावी, असे सहनियंत्रक सु. ह. चाटे यांनी कळविले आहे. बीड जिल्ह्यासाठी उपनियंत्रक गं, मा, कांबळे हे वैध मापनशास्त्र विभाग कार्यालयाचे प्रमुख आहेत.

प्रशासन, शेतकरी संघटना प्रतिनिधींकडून खातरजमा

तहसीलदार राकेश गिड्ढे, तहसीलदार संतोष रुईकर, पुरवठा निरीक्षक एस. जी. रामटेके, लेखा परीक्षक सुनील रेणुके, लेखा परीक्षक बी. आर. कवडे, वैधमापन निरीक्षक गणेश मिसाळ, विठ्ठल चिट्टलवाड, पोलिस निरीक्षक बालक कोळी, सहायक पोलिस निरीक्षक महेश क्षीरसागर, शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी भाई मोहन गुंड, भाई नारायण गोले, कारखाना प्रतिनिधी बी. आय. मुजावर, रामभाऊ काळदाते आदींनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील कारखान्यांची तपासणी करुन वजन काटे सुस्थितीत व योग्य मापन होत असल्याची खात्री करण्यात आली.

उर्वरित पाच कारखान्यात तपासण्या लवकरच

जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील एनएसएल शुगर, छत्रपती साखर कारखाना, केज तालुक्यातील गंगामाऊली शुगर ॲन्ड अलाइड इंडस्ट्रीज आणि येडेश्वरी ॲग्रो प्रोडक्ट या चार साखर कारखान्यातील वजन काटे तपासणी व पडताळणी पथकांमार्फत करण्यात आली आहे. उर्वरित तपासण्याही येत्या आठवड्यात होणार आहेत.

हेही वाचा : एक एकर दोडका ठरला पारंपरिक शेतीच्या तुलनेत लाख फायद्याचा; वाचा प्रकाशरावांची यशकथा

English
हिंदी सारांश
Web Title : Sugar mills face scrutiny over weight discrepancies after farmer complaints.

Web Summary : Following farmer complaints of weight discrepancies, sugar mills in Beed district are under investigation. Authorities are verifying weighing scales at nine mills. Farmers are urged to cross-check weights and report discrepancies to the Weights and Measures Department. Inspections are underway; remaining mills will be checked soon.
टॅग्स :बीडमराठवाडासाखर कारखानेऊसशेतकरीशेती क्षेत्र