Join us

गुणकारी करवंदांचे उत्पादन घटले; अवकाळी पावसाचा रानमेव्याला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 10:25 AM

करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहावयास मिळतात.

डॉगरची काळी मैना म्हणून ओळखली जाणाऱ्या करवंदावर यावर्षी हवामानातील बदलाचा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कोकणात मुबलक प्रमाणात आढळणारी करवंद यावर्षी मात्र कमी प्रमाणात दिसून येत आहेत.

करवंदे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात व कोकणात खूप प्रमाणात मिळतात. डोंगरकपारीत ग्रामीण भागातील रस्त्याच्या कडेला आपोआप उगवणारी करवंदाची काटेरी झुडपे अनेकदा पाहावयास मिळतात. एप्रिल मे महिन्यात आंबा, काजू, फणस, कलिंगड बरोबरच या काळात रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो.

वर्षातून एकदा मिळणाऱ्या या फळांना उन्हाळ्यात आबालवृद्ध आवर्जून चवीने खाताना दिसतात. उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात. चवीने आंबट-गोड असणारे करवंद खट्टा-मीठा या नावाने देखील ओळखला जाणारा हा रानमेवा डोंगरकड्यांवर मिळतो. असंख्य काट्यांमध्ये लपून बसलेल्या करवंदामुळे अनेक शारीरिक व्याधी बरी होतात.

करवंद अनेक अर्थाने गुणकारी• हिरव्या करवंदाचे लोणचे चटणी तसेच पिकलेल्या करवंदाचा सरबतही केला जातो. करवंदाचे औषधी गुणधर्म आरोग्यासाठीही तितकेच फायदेशीर तसेच गुणकारी आहेत.• दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात करवंदाची फळे खूप लाभदायक ठरतात. रक्तातील कमतरता, अशक्तपणा जाणवत असेल तर करवंद गुणकारी आहे.• रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्वचाविकार बरे होतात, रक्तवाहिन्यांमधील चरबीचे प्रमाण कमी होते, उष्णतेचे विकार बरे होतात, अपचनाचा त्रास होत असेल तर करवंदाचं सरबत गुणकारी आहे.

अधिक वाचा: बहुगुणी करवंदाचे संवर्धन करत व्यावसायिक लागवडीतून कमवा अधिकचा नफा

दिवसेंदिवस दुर्मीळ• ८०-९० च्या दशकापर्यंत उन्हाळा सुरू झाला की गावांतील छोट्या मोठ्या बाजारपेठात डोंगरची काळी मैना स्थानिक शेतकरी विकायला आणायचे.• एका टोपलीत असंख्य काळी भोर अशी लहान टपोरी करवंद असायची. पानांचा घडी मारून लहानसा द्रोण तयार करून करवंद विकली जायची.• त्याकाळी आवडीने खाल्ली जाणारी करवंद आता मात्र काळानुरूप दिवसेंदिवस दुर्मीळ होत आहेत.• सध्या बाजारात फार कमी वेळा करवंद पाहायला मिळतात. निसर्गाच्या लहरीपणामुळे करवंदासारखा रानमेवा वर्षागणिक दुर्मीळ होत आहे.

आंबा, काजू, रतांबा याबरोबर करवंद, चारोळी यासारख्या रानमेव्यावरही अवकाळी पाऊस व धुके यांचा फलधारणेवर परिणाम झालेला आहे. कोणतीही लागवड न करता पूर्णपणे नैसर्गिक चवीचा आणि औषधी गुणधर्म असणारा रानमेवा दिवसेंदिवस दुर्मीळ होत आहे. - संतोष तावडे, प्रगतिशील शेतकरी, शिरगाव

टॅग्स :फळेआरोग्यफलोत्पादनशेतकरीपाऊसगारपीट