Join us

हवामान ढगाळ, तुरळक सरी, नुकसानीच्या भीतीने धास्तावला आंबा शेतकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 04, 2024 11:53 AM

आंबा, जांभूळ या फळांचा मोहर गळू लागला आहे, तर तयार फळे, भाजीपाल्यांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने शेतकरीराजा धास्तावला आहे.

पालघर जिल्ह्यात काही भागात १ मार्च रोजी तुरळक पावसाच्या सरी पडल्या, तर गेले दोन दिवस ढगाळ वातावरणाचा प्रत्यय येत असून, शीतवारेही वाहत आहेत. या बदलत्या वातावरणाचा फटका उन्हाळी पिके, भाजीपाला व फळ पिकावर होत आहे.

आंबा, जांभूळ या फळांचा मोहर गळू लागला आहे, तर तयार फळे, भाजीपाल्यांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने होणाऱ्या नुकसानीच्या भीतीने शेतकरीराजा धास्तावला आहे. ढगाळ हवामानामुळे शेतीपिकांवर संकटांचे मळभ असल्याने शेतकऱ्यांनी फवारणीला सुरुवात केली आहे.

तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील वातावरणात आकाश अंशता ढगाळ व तापमानात चढ-उतार दिसून येत आहे. त्याचा थेट परिणाम उन्हाळी पिके, भाजीपाला व फळ पिकावर होऊन कीड व रोग प्रादुर्भावाची शक्यता बळावली आहे. आंबा, चिकू, केळी, काजू आणि जांभूळ बागायतदारांवर संकटाचे ढग दाटले आहेत.

अधिक वाचा: आंबा फळ पिकातील मोहोराचे संरक्षण कसे कराल?

कीडरोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांचा फवारणीकडे कल वाढला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी बागेचे निरीक्षण करावे व पिकाच्या संरक्षणासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले कीटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करावी, असा कृषी सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

कृषीतज्ज्ञांचा सल्ला आंबा फळांवर फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येण्याची शक्यता असल्याने बागेमधील गळलेली फळे गोळा करून नष्ट करावीत आणि आंबा फळांचे फळमाशीपासून संरक्षण करण्यासाठी विद्यापीठाने शिफारस केलेले 'रक्षक फळमाशी सापळा' प्रतीएकरी ४ या प्रमाणात बागेमध्ये झाडांच्या उंचीप्रमाणे साधारण जमिनीपासून २ ते ३ मीटर उंचीवर राहील अशा प्रकारे टांगावा. असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र, कोसबाड हिल येथील प्रमुख डॉ. विलास जाधव यांनी दिला आहे.

टॅग्स :शेतकरीआंबाशेतीपाऊसहवामानपालघर