बाळासाहेब गणोरकर
कडक उन्हात दिवसभर शेतात भटकत, एक-एक गव्हाच्या ओंब्या किंवा हरभऱ्याच्या शेंगा वेचून जमा करण्याची 'सरवा' ही ग्रामीण परंपरा आता हळूहळू कालबाह्य होत चालली आहे. कापणीनंतर शेतात उरलेले किंवा पडून राहिलेले धान्य वेचून त्याचे मळणी व साफसफाई करून मिळवलेले दाणे म्हणजेच 'सरवा' अशी या पारंपरिक प्रक्रियेची ओळख होती.
पूर्वी गहू, हरभरा किंवा इतर पिकांची कापणी झाल्यानंतर उरलेले दाणे गोळा करण्याचे काम प्रामुख्याने मजूर महिलांकडून केले जात असे. कडक उन्हात, तहान-भूक विसरून त्या शेतात फिरत प्रत्येक दाणा वेचत असत. या प्रक्रियेतून मिळालेल्या धान्यातील काही भाग शेतमालकाला देऊन उरलेले धान्य त्या आपल्या घरी नेत असत.
शेतकऱ्यांचाही दृष्टिकोन उदार होता. शेतात पडून राहिलेल्या गव्हाच्या ओंब्या, ज्वारीची कणसे किंवा कडधान्ये वाया जाण्यापेक्षा गरजू लोकांच्या पोटात जावीत, ही भावना त्यामागे असायची. त्यामुळे 'सरवा' ही केवळ उपजीविकेची नव्हे, तर सामाजिक संवेदनशीलतेचीही परंपरा मानली जात होती.
शेवया, कुरड्यांसाठी गव्हाचा उपयोग
या 'सरवा'तून मिळालेल्या धान्यापासून ग्रामीण भागात विविध पारंपरिक पदार्थ तयार केले जात. गहू भिजवून शेवया बनवणे, चिकाच्या कुरड्या तयार करणे, अशा अनेक पदार्थातून या धान्याचा उपयोग होत असे. आजच्या बदलत्या काळात ही परंपरा लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
सरवा वेचणीकडे पाठ
अन्नधान्याची टंचाई कमी झाल्याने, तसेच सर्व गोष्टींचे आर्थिक मोल वाढल्याने 'सरवा' वेचण्याची गरज उरलेली नाही. शासनाकडून मिळणारे मोफत धान्य, विविध योजनांमधून मिळणारा आर्थिक आधार यामुळे शेतमजुरांचे जीवनमान सुधारले आहे. परिणामी, कष्टदायक 'सरवा' वेचणीपासून त्यांनी पाठ फिरवली आहे.
उरलेले धान्य गुरांच्या खाण्यात किंवा जमिनीतच
आज परिस्थिती अशी आहे की, शेतात उरलेले धान्य गुरांच्या खाण्यात किंवा जमिनीतच गाडले जाते. एकेकाळी गरिबांच्या पोटाला आधार देणारी 'सरवा' ही परंपरा आता इतिहासजमा होत आहे.
Web Summary : The traditional practice of 'Sarva,' collecting leftover grains, is disappearing. Free grain programs and improved living standards have reduced the need for this labor-intensive task. Leftover grain is now often fed to animals or plowed back into the soil, marking the end of an era.
Web Summary : 'सरवा' की पारंपरिक प्रथा, बचे हुए अनाज को इकट्ठा करना, गायब हो रही है। मुफ्त अनाज कार्यक्रमों और बेहतर जीवन स्तर ने इस श्रम-गहन कार्य की आवश्यकता को कम कर दिया है। बचा हुआ अनाज अब अक्सर जानवरों को खिलाया जाता है या वापस मिट्टी में मिला दिया जाता है, जो एक युग के अंत का प्रतीक है।