नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने राज्यात तब्बल ६० खासगी दस्त नोंदणी कार्यालये सुरू करण्याचे ठरविले असून त्यासाठी अतिरिक्त ६ हजार रुपये देऊन ग्राहकांना जादा सोयी पुरविण्यात येणार आहेत.
ही कार्यालये सुरू करण्यासाठी निविदा काढण्यात आल्या असून पुढील सहा महिन्यांत पहिल्या टप्प्यात पुणे, मुंबईसारख्या मोठ्या शहरात ३० कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत.
दुसऱ्या टप्प्यात पुढील दीड वर्षात प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयी एकूण ३० कार्यालये सुरू करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने दस्त नोंदणीची सुविधा देण्यासाठी खासगी संस्थांची मदत घेतली जाणार आहे.
राज्यात अशी ६० कार्यालये स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. या कार्यालयांमधून पासपोर्ट कार्यालयात देण्यात येणाऱ्या सुविधा देण्यात येतील.
या सुविधा देताना नागरिकांकडून अतिरिक्त सेवा शुल्क आकारले जाणार आहे. हे शुल्क आता जास्तीत जास्त ६ हजार रुपये आकारण्यात येणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या आहेत. कमीतकमी दर आकारणाऱ्या संस्थेला हे काम देण्यात येणार आहे.
निविदा भरण्यासाठी आज २५ ऑक्टोबरची मुदत असून नोव्हेंबरमध्ये निविदा उघडून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून देण्यात आली.
अधिक वाचा: जमीन मोजणीसाठी आता वाट पाहू नका; 'ह्या' नवीन प्रणालीने मोजणी होणार फक्त ३० दिवसांत
