Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेशनकार्डवरील रॉकेल वाटपाचा दर ठरला; प्रतिलिटर किती रुपयाने मिळणार रॉकेल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 08:46 IST

rockel vatap dar युद्धजन्य परिस्थितीत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने शिधापत्रिकेवरून रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे : युद्धजन्य परिस्थितीत स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर राज्य सरकारने शिधापत्रिकेवरून रॉकेल देण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार पुणे जिल्ह्याला २ लाख ४ हजार लिटर रॉकेलचा पुरवठा केला जाणार असून, जिल्हा प्रशासनाने तालुकानिहाय कोटा निश्चित केला आहे.

यात बारामती तालुक्याला सर्वाधिक ३३ हजार लिटर रॉकेल पुरवठा केला जाणार असून, इंदापूर तालुक्यात २७ हजार लिटरचा पुरवठा होणार आहे. हा पुरवठा करताना आता नगरपालिका क्षेत्रही वगळण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

त्यामुळे केवळ ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच या रॉकेलचा पुरवठा केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी दिली. दरम्यान हे रॉकेल प्रतिलिटर ६२ रुपये या दराने शिधापत्रिकेवर विक्री करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारने राज्यात रॉकेल शिधापत्रिकांच्या माध्यमातून देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यासाठी ३७ लाख ४४ हजार लिटरचा कोटा निश्चित केला आहे. त्यानुसार अंत्योदय व प्राधान्य योजनेतील लाभार्थ्यांना या रॉकेलची वितरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

मात्र, जिल्हानिहाय कोटा आणि शिधापत्रिकांची संख्या यात प्रचंड तफावत असल्याने हे रॉकेल वितरण नेमके कोणाला करावे, असा प्रश्न जिल्हा प्रशासनापुढे उपस्थित झाला होता.

त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या संदर्भात रॉकेल वितरणाबाबत निर्देश दिले. शिधापत्रिकांची संख्या लक्षात घेता जिल्ह्याला किमान २४ लाख ३६ हजार लिटरची गरज होती.

मात्र, प्रत्यक्ष मिळालेला कोटा अत्यल्प असल्याने केवळ अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाच याचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

त्यातही सध्याचा उपलब्ध असलेला कोटा लक्षात घेता गरजूंना त्याचे वितरण करण्यासाठी जिल्ह्यातील मोठ्या नगरपालिका क्षेत्रांमधील नागरिकांनाही रॉकेल न देण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.

त्यानुसार आता हे वितरण नगरपालिका क्षेत्र वगळून अन्य ग्रामीण भागातच केले जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिधापत्रिकेद्वारे विक्री◼️ जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधळकर यांनी तालुकानिहाय शिधापत्रिकांची संख्या लक्षात घेऊन कोटा निश्चित केला आहे.◼️ त्यानुसार सर्वाधिक ३३ हजार लिटरचा कोटा बारामती तालुक्याला देण्यात येणार आहे.◼️ त्यानंतर इंदापूर तालुक्याला २७ हजार लिटरचे वितरण होणार आहे.◼️ रॉकेलचा पुरवठा करण्यासाठी तीन घाऊक विक्रेत्यांना नेमण्यात आल्याची माहिती सुधळकर यांनी यावेळी दिली.◼️ रॉकेल विक्रीसाठी राज्य सरकारने दिलेल्या निर्देशानुसार कमिशनसह सुमारे ६२ रुपये लिटर या दराने रॉकेलची विक्री शिधापत्रिकेवरून केली जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

तालुकानिहाय रॉकेलचा कोटा निश्चित केल्यानंतर पुढील दोन ते तीन दिवसांत त्याचे वितरण तालुक्याला केले जाणार आहे. सोमवारपासून रॉकेलची विक्री करण्याचे निर्देश दुकानदारांना दिले आहेत. - महेश सुधळकर, जिल्हा पुरवठा अधिकारी, पुणे

अधिक वाचा: थकबाकीदार शेतकऱ्यांना दिलासा; आता एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरु, कुणाला होणार फायदा?

English
हिंदी सारांश
Web Title : Ration card kerosene rate fixed: Price per liter announced.

Web Summary : Pune district will distribute kerosene at ₹62/liter via ration cards to Antyodaya beneficiaries in rural areas due to gas shortages. Baramati gets the largest quota. Distribution starts soon, excluding municipal areas.
टॅग्स :एलपीजी गॅस टंचाईसरकारयुद्धराज्य सरकारपुणेकेंद्र सरकारबारामती