Join us
Daily Top 2Weekly Top 5

टेमघर प्रकल्पग्रस्तांना भूसंपादनासाठीचा वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा; कधी मिळणार पैसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 12:46 IST

temghar dam bhusampadan जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने यासाठी ३९ प्रकरणांमधील शेतकऱ्यांना २६ कोटी १४ लाख रुपयांचा निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे जमा केला आहे.

पुणे : टेमघर प्रकल्पग्रस्तांना अखेर भूसंपादनासाठीचा वाढीव मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार जलसंपदा विभागाने यासाठी ३९ प्रकरणांमधील शेतकऱ्यांना २६ कोटी १४ लाख रुपयांचा निधी कृष्णा खोरे विकास महामंडळाकडे जमा केला आहे.

येत्या दोन दिवसांत हा निधी न्यायालयात जमा करण्यात येणार असून त्यानंतर तो शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

जिल्हा सत्र न्यायालयाने अडीच वर्षापूर्वी टेमघर प्रकल्पग्रस्तांसाठी वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिल्यानंतरही तो देण्यात आला नव्हता. त्यानंतर न्यायालयाने भूसंपादन कार्यालयातील खुर्चीचे दोन वेळा जप्तीचे आदेश दिले होते.

गेल्या आठवड्यात शेतकरी आणि न्यायालयाच्या बेलिफ यांनी जिल्हा प्रशासनाच्या भूसंपादन अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील खुर्चीच्या जप्तीची कारवाई करण्याबाबत आग्रह धरला होता.

त्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी तसेच भूसंपादन समन्वयक डॉ. कल्याण पांढरे यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. हेमंत धुमाळ यांच्याशी चर्चा केली होती.

धुमाळ यांनी तत्काळ अतिरिक्त मुख्य सचिवांशी बोलून यात मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद देत सचिवांनी पुढील आठ दिवसांत हा वाढीव मोबदला देण्याचे देण्याचे मान्य केले होते.

त्यानुसार जलसंपदा विभागाने ३९ भूसंपादन प्रकरणांमधील शेतकऱ्यांना २६ कोटी १४ लाख ९४ हजार ८८० रुपयांचा निधी महामंडळाकडे जमा केला आहे.

अधिक वाचा: Budget 2026 : यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना काय मिळालं; कोणत्या योजनेला किती निधी?

English
हिंदी सारांश
Web Title : Temghar Project Affected Farmers to Finally Receive Increased Compensation

Web Summary : Temghar project-affected farmers will finally receive increased land acquisition compensation. The Water Resources Department deposited ₹26.14 crore with the Krishna Valley Development Corporation following court orders. The funds will soon be disbursed to farmers' accounts after being deposited in court.
टॅग्स :धरणशेतकरीशेतीपुणेजिल्हाधिकारीन्यायालयसत्र न्यायालयसरकारराज्य सरकार