पुणे : राज्यात अतिवृष्टीमुळे गेल्या आठवडाभरात सुमारे पावणेदोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. संपूर्ण ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार हेक्टरवरील पिके पाण्यात गेली आहेत.
नांदेड, लातूर व गोंदिया जिल्ह्यांत गुरुवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या नुकसानीची आकडेवारी शनिवारपर्यंत प्राप्त होणार आहे. त्यामुळे एकूण नुकसानीची आकडेवारी वाढण्याची शक्यता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
राज्यात गेल्या आठवडाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे २९ जिल्ह्यांमधील १ लाख ७८ हजार १३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथिमक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे, तर आतापर्यंत एकूण १० लाख ५६ हजार ८९७ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
त्यात सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, भात, तूर, उडीद मूग यासह भाजीपाला, फळपिके व उसाचाही समावेश आहे. कृषी विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १० लाख ५६ हजार ८९७ हेक्टरचे नुकसान झाले आहे.
त्यानुसार सर्वाधिक २ लाख ८५ हजार ५४३ हेक्टरवील नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून यवतमाळ जिल्ह्यात १ लाख ५१ हजार २९० हेक्टरवरील पिकांना पावसाचा फटका बसला आहे.
मराठवाड्यातील तसेच पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत गुरुवारीही अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमधील नुकसानीची आकडेवारी अद्याप प्राप्त होऊ शकलेली नाही. हा आकडा मिळाल्यानंतर एकूण नुकसान वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
यात नांदेड, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत अतिवृष्टीचा फटका मोठा असून येथे ओला दुष्काळाचे चित्र निर्माण झाले आहे. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद मुगासारखी पिके पूर्णपणे हातून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.
परिणामी, शेतकरी आता राज्य सरकारच्या आर्थिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्य सरकारने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पंचनामे पूर्ण होण्यासाठी किमान तीन आठवडे लागण्याची शक्यता आहे.
ऑगस्टमधील जिल्हानिहाय हेक्टरमध्ये नुकसान असेबुलढाणा - ८९,७७८अमरावती - ३३,३२९यवतमाळ - १,५१,२९०अकोला - ४३,७०३नागपूर - १,१००चंद्रपूर - ४,३००वर्धा - ७७६गडचिरोली - ४८८सोलापूर - ४७,२६६अहिल्यानगर - ७२सांगली - ४,९७२सातारा - ३४कोल्हापूर - ९,३७९नाशिक - ४,२३९नांदेड - २,८५,५४३
अधिक वाचा: सोयाबीनमध्ये पांढऱ्या माशीमुळे होतोय 'या' रोगाचा प्रादुर्भाव; कसे कराल नियंत्रण?