प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा एप्रिल ते जूनपर्यंतचा २० वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार आहे. विविध त्रुटींच्या पूर्ततेअभावी लाभार्थी वंचित राहण्याची शक्यता आहे.
बऱ्याच जिल्ह्यात ३१ मेपर्यंत शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण, मोहीम राबवून ई-केवायसी स्वयंनोंदणीकृत शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी मान्यता देणे, बँक खाती आधार सिडिंग करणे, भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करण्यात येणार आहे.
ई-केवायसी प्रमाणीकरणासाठी मोबाइल अॅपमधून चेहरा किंवा अंगठा स्कॅन करावा किंवा महा ई-सेवा केंद्र, कृषी सहायक यांच्याशी संपर्क साधावा.
नव्याने नोंदणीसाठी फेरफार पोर्टलवर माहिती अपलोड करावी किंवा महा ई-सेवा केंद्राशी संपर्क साधावा. बँक आधार सिडिंगसाठी, 'नमो शेतकरी'च्या लाभासाठी बँक शाखेशी संपर्क साधावा किंवा जवळच्या पोस्टात डीबीटी खाते उघडावे.
केंद्र शासन पी. एम. किसानचा २० वा हप्ता जूनमध्ये वितरित होणार असून, त्यापूर्वी प्रलंबित बाबीची पूर्तता व्हावी. 'पीएम किसान'च्या लाभार्थ्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ होईल.
शासकीय योजनांचा लाभ हवा असेल तर शासनाने फार्मर आयडीची सक्ती केली आहे. पी. एम. किसान पेन्शनचा लाभ घेणारे परंतु फार्मर आयडी न काढणारे या योजनेला मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे फार्मर शेतकऱ्यांनी आयडीही काढून घ्यावा.
दोन्ही योजनांच्या लाभासाठी ३१ मेपर्यंत आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अधिक माहितीसाठी कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
अधिक वाचा: बियाणे घरचे असो अथवा विकतचे, पेरणी अगोदर ही सोपी तपासणी कराच? वाचा सविस्तर