Pune : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी सातारा जिल्ह्यात असलेल्या मध्यवर्ती ऊस संसोधन केंद्राला भेट दिली. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने तयार केलेल्या विविध ऊसांच्या जाती आणि प्लॉटला भेट देऊन या संसोधन केंद्राने जागतिक दर्जाचे काम उभे केले आहे अशी भावना व्यक्त केली. यासोबतच यामध्ये आजपर्यंत कार्यरत होऊन गेलेल्या सर्व ऊस विशेषज्ञांपासून ते प्रत्यक्ष कष्ट करणाऱ्या सर्व मजुरांचा देखील महत्त्वाचा व मोलाचा वाटा असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, "संशोधन केंद्राची इथपर्यंतची यशस्वी वाटचाल होण्यामध्ये विद्यापीठाचे सर्व माजी कुलगुरू व संशोधन संचालकांचे देखील मोठे योगदान आहे. या यशस्वी कामामध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे असून आज अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या घरांना या ऊस संशोधन केंद्राने विकसीत केलेल्या वाणांची नावे दिली आहेत हेच या संशोधन केंद्राचे सर्वात मोठे वैभव आहे." असं मत कुलगुरु डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केले. यावेळी संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के, पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे उपस्थित होते.
"या संशोधन केंद्राची इमारत जुनी झाल्यामुळे महाराष्ट्र शासनाने संशोधन केंद्रास नवीन प्रशासकीय इमारत, प्रयोगशाळा, शेतकरी प्रशिक्षण सभागृह व कर्मचारी निवासस्थानांकरीता भरीव मदत केल्याबद्दल मी शासनाचे आभार व्यक्त करतो. संशोधनाचे कार्य प्रभावीरीत्या पुढे नेण्यासाठी केवळ इमारतीच नव्हे तर प्रयोगशाळांमध्ये आधुनिक उपकरणे, कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्स असे आधुनिक तंत्रज्ञान, रस्ते, कुंपण भिंत, अश्या स्वरूपाच्या अनेक सोई-सुविधा निर्माण करण्यासाठी संशोधन केंद्राचे आधुनिकीकरण व बळकटीकरण होणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. या संशोधन केंद्रातील ऐतिहासिक जुन्या वास्तू, वस्तू, यंत्रे व उपकरणांचे वारसा स्वरूपात जतन व्हावे" अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या संशोधन केंद्राची आजपर्यंतची वाटचाल कौतुकास्पद असून सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत. यावेळी त्यांनी संशोधन केंद्राच्या नवीन होऊ घातलेल्या कार्यालयीन इमारती, प्रयोगशाळा, शेतकरी प्रशिक्षण व निवासस्थान तसेच कर्मचारी निवासस्थान या जागांची देखील त्यांनी पाहणी करुन महत्वपूर्ण सूचना केल्या.
यावेळी डॉ. विठ्ठल शिर्के म्हणाले की, महाराष्ट्राच्या अर्थकारणात ऊस पीक महत्त्वाचे असून महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात राहुरीच्या मध्यवर्ती परिसरानंतर सगळ्यात महत्त्वाचे ठिकाण मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव आहे. यावेळेस कुलगुरु महोदयांनी संशोधन केंद्रातील सर्व विभाग, प्रयोगशाळा, संशोधन, बिजोत्पादन व प्रात्यक्षिक प्रक्षेत्र, निवासस्थाने प्रक्षेत्र यांना भेटी देऊन सर्व संशोधन व विस्तार कामाचा आढावा घेतला.
भेटीच्या सुरुवातीस डॉ. राजेंद्र भिलारे यांनी संशोधन केंद्राचा इतिहास, प्रक्षेत्र, संसाधने, मनुष्यबळ, चाललेले संशोधन व विस्तार कार्य आणि इतर सर्व उपक्रमांबद्दल सविस्तर सादरीकरण करून माहिती दिली. याप्रसंगी संशोधन केंद्रातील ऊस शरीरक्रिया शास्त्रज्ञ डॉ. कैलास भोईटे, ऊस रोगशास्त्रज्ञ डॉ. सुरज नलावडे व ऊस पैदासकार डॉ. सुरेश उबाळे यांच्यासह सर्व शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दत्तात्रय थोरवे यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. सुरेश उबाळे यांनी केले.
