चंद्रशेखर बर्वे
कर्जाचा वाढता डोंगर आणि सततच्या नापिकीमुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग निवडत असतानाचे चित्र बघायला मिळत असतानाच देशातील शेतकऱ्याला शेतीतून दरमहा ३,७९८ रुपयाची कमाई होत असल्याची माहिती सरकारने लोकसभेत दिली आहे.
तर, महाराष्ट्रातील शेतकऱ्याला शेतीतून ४,७४७ रुपये उत्पन्न होत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांनी करीत शेतकऱ्यांच्या मासिक उत्पन्नाची माहिती लोकसभेत दिली आहे.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने (एनएसएसओ) जुलै २०१८ ते जून २०१९ या काळात शेतकऱ्यांच्या उत्पन्नाबाबत सर्वेक्षण केले होते. आतापर्यंतच्या या अद्ययावत अहवालानुसार देशातील शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न दरमहा १० हजार २१८ रुपये, तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे एकूण उत्पन्न दरमहा हजार ४९२ रुपये आहे. एकूण उत्पन्नाच्या बाबतीत ईशान्येकडील राज्यांतील शेतकरी आघाडीवर आहेत.
यात पहिल्या क्रमांकावर मेघालय (२९,३४८ रु.) आहे. यानंतर मिझोरम (१७,९६४) आणि उत्तराखंड (१३,५५२) दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे. एकूण उत्पन्न म्हणजे शेतीतील उत्पन्न, मजुरीचे, बटई, पशुपालन- दुग्धव्यवसाय आणि गैर कृषी कामातून मिळणारे उत्पन्न होय.
मात्र, निव्वळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा आकडा खूप कमी आहे. सर्वेक्षणानुसार, देशातील शेतकऱ्याला शेतीतून केवळ ३,७९८ रुपये दरमहा मिळतात. यातही पहिल्या क्रमांकावर मेघालय (२१,०६०) आहे. पंजाब (१२,५९७), हरयाणा (९,०९२) आणि कर्नाटकचा (६,८३५) समावेश आहे.
उर्वरित राज्यांतील शेतकऱ्यांना निव्वळ शेतीतून मिळणारे उत्पन्न फारच कमी आहे. पश्चिम बंगालचा शेतकरी शेतीतून केवळ १,५४७ रुपये महिन्याकाठी कमवितो. तर महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दरमहा ४,७४७ रुपये मिळतात.
कृषी राज्यमंत्री भगीरथ चौधरी यांची शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची माहिती
राज्य | निव्वळ शेतीतील उत्पन्न | एकूण उत्पन्न |
पश्चिम बंगाल | १५४७ | ६७६२ |
ओडिशा | १५६९ | ५११२ |
झारखंड | ११०२ | ४८९५ |
जम्मू काश्मीर | १९८० | १८९१८ |
बिहार | २७३९ | ७५४२ |
हिमाचल प्रदेश | २५५२ | १२१५३ |
आंध्र प्रदेश | २७३४ | १०४८० |
तामिळनाडू | २६४१ | ११९२४ |
केरळ | ३६३८ | १७९१५ |
राजस्थान | ३७३१ | १२५२० |
उत्तर प्रदेश | ३२९० | ८०६१ |
गुजरात | ४३१८ | १२६३१ |
छत्तीसगड | ४३३६ | ९६७७ |
महाराष्ट्र | ४७४७ | ११४९२ |
मध्य प्रदेश | ४३०९ | ८३३९ |
तेलंगणा | ४९३७ | ९४०३ |
दहा वर्षांत १ लाख १२ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार मागील दहा वर्षात १ लाख १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहेत. २०२२ मध्ये आपल्या अहवालात म्हटले आहे. ११,२९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे, असे 'स्टॅटिस्टा' या जागतिक संस्थेने आपल्या अहवालात म्हटले आहे.