एकेकाळी शेताच्या बांधावर कुंपण आणि आयुर्वेदिक औषधी म्हणून हमखास जोपासल्या जाणारे शेराचे झाड आज दुर्मीळ झाले आहे. शेराचे हे झाड कधीतरी कुठेतरी नजरेस पडते.
यामुळे या नव्या पिढीला झाडाची ओळख नाही. शेती पिकांवर पडणाऱ्या रोग आणि मानवासाठी औषधी गुणधर्म असलेल्या शेराच्या झाडाची शेतीच्या बांधावर नव्याने जोपासणा होणार का, हा प्रश्नच आहे.
आज सततच्या हवामान बदलामुळे पिकांवर नवनीवन रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. त्यासाठी शेतकऱ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतात. तरीदेखील रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात येताना दिसत नाही.
मात्र पूर्वी आजोबा, पणजोबांकडून शेताच्या धुऱ्या, बंधाऱ्यावर शेराच्या झाडाची जोपासणा केली जात होती. दोन दशकांपूर्वी शेतीच्या बांधावर शेराच्या झाडामुळे शेती पिकांवर पडणारे अनेक रोग अडवण्याचे अप्रत्यक्षरीत्या काम या झाडामुळे होत असे.
तसेच हे झाड अत्यंत जहाल समजले जायचे. चुकून झाडाचा चीक शरीरावर पडल्यास किंवा डोळ्यात गेल्यास त्यांचे विपरीत परिणामदेखील होतात. त्यामुळे लहान मुले आणि जनावरांनादेखील या झाडापासून दूर ठेवावे लागते.
ज्वारीचे पीक खाल्ल्यानंतर किराळ लागण्याचा प्रकार झाल्यास जनावरांना या झाडाच्या फांद्या खायला दिल्या जात, असे जुने शेतकरी सांगतात.
शरीरासाठी घातक असलेल्या या झाडाची सावली मात्र, आरोग्यदायी असते. जनावरांच्या गोठ्यातील डासांचा उपद्रव रोखण्यासाठी शेतकरी शेराची फांदी गोठ्यात ठेवायचे.
तसेच शेतातील पिकांच्या मुळ्या खाणाऱ्या अळीचा बंदोबस्त करण्यासाठीही शेतकरी शेराच्या फांदीचा उपयोग करायचे. परंतु, कालांतराने या झाडाच्या फायद्याची जनजागृती कृषी विद्यापीठाकडून झालेली नाही.
शेतीच्या बांधावर गोड बाभळ, बोरीचे झाड, आवळा, शेर, रूट आदी झाडे असणे गरजेचे आहे. शेराचे झाड विषमुक्त शेतीसाठी आणि पिकांवरील रोगराईच्या नियंत्रणासाठी महत्त्वाचे आहे. श्रीगोंदा येथे एक शेतकरी या झाडांची रोपे शेतकऱ्यांसाठी निःशुल्क उपलब्ध करून देतात. - पांडुरंग डोंगरे, शेतकरी, मठपिंपळगाव जि. जालना.