Pune : राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्ष असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी नव्या वर्षात "संवाद सेतू" हा उपक्रम कृषी विभागाकडून राबवण्यात येत आहे. यासंदर्भात राज्याचे कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी विभागाच्या सर्व संघटनांना आवाहन केले आहे.
कृषी विभाग म्हणजे खेडोपाडी थेट शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी जोडली गेलेली सर्वात मोठी यंत्रणा आहे. मुख्यालयातील अधिकारी वगळता सहाय्यक जवळपास १० हजार अधिकारी गाव पातळीवर प्रत्यक्ष उपलब्ध आहेत. कृषी अधिकारी विविध कारणांसाठी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेत असतात. परंतु त्यासाठी शेतीशाळा, चर्चासत्रे किवा मोका तपासणी या कामांचे निमित्त असते. कामाचा एक भाग म्हणून या भेटीगाठी होतात मात्र त्यातून पुरेसा संवाद साधला जात नाही. यासाठी राज्याचा कृषी विभाग आणि शेतकरी यांच्यातील वर्षानुवर्ष असलेलं नातं अधिक घट्ट करण्यासाठी नव्या वर्षात "संवाद सेतू" उपक्रम राबण्यात येत आहे.
संवाद सेतू उपक्रमांतर्गत आठवड्यातून कोणत्याही दोन दिवशी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या सोयीनुसार, वेळेनुसार त्यांच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही भागात जाऊन शेतकऱ्यांची मुक्त संवाद साधतील. सामाजिक हेतूने व पालक यंत्रणा म्हणून शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतील. त्यांच्याकडून अपेक्षा, मार्गदर्शन, सूचना व अभिनव कल्पना घेऊन विभागाचे कामकाजामध्ये सुधारणा करणे व कृषी विभाग व शेतकऱ्यांमधील नाते अधिक घट्ट करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमाचे आहे.
या उपक्रमासाठी कोणतेही नियम, सक्ती किंवा औपचारीकता नसून आपल्या हक्काचा कोणी माणूस गावात उपलब्ध आहे ही भावना शेतकऱ्यांच्या मनात तयार करणे हा उद्देश आहे. या भेटीदरम्यान आपल्याला आलेले कार्यवाहीयोग्य अनुभव आपण जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांचेमार्फत आयुक्त कार्यालयाकडे सादर करावेत अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या.
विभागातील सर्व संघटनांनी या उपक्रमास पाठिंबा दिलेला असून महाराष्ट्र राज्य सहाय्यक कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विलास रिंढे, कृषी अधिकारी संघटनेचे अध्यक्ष हितेंद्र पगार व महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग-2 राजपत्रित अधिकारी कल्याणकारी संघटनेचे अध्यक्ष विनय कदम यांनी या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले असून हा स्तुत्य उपक्रम राबविण्यासाठी व त्याद्वारे शेतकऱ्यांना अधिकाधिक तत्पर सेवा देण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी एकजूटीने प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही दिली.
