Join us

उच्चांकी ऊसदरात अग्रेसर असणाऱ्या दत्त दालमियाचा पहिला हप्ता जाहीर; कसा दिला दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 12:09 IST

Datta Dalmia Sugar उच्चांकी साखर उताऱ्याप्रमाणे उच्चांकी ऊसदरात अग्रेसर असणाऱ्या आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया भारत शुगर साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील तुटलेल्या उसाला प्रतिटन ३३०० पहिली उचल देणार आहे.

पोर्ले तर्फ ठाणे: उच्चांकी साखर उताऱ्याप्रमाणे उच्चांकी ऊसदरात अग्रेसर असणाऱ्या आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त दालमिया भारत शुगर साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामातील तुटलेल्या उसाला प्रतिटन ३३०० पहिली उचल देणार आहे.

तर एफआरपीच्या धोरणानुसार साखर उताऱ्यातील अंतिम आकडेवारीनंतर उर्वरित अंतिम हप्ता हंगाम समाप्तीनंतर शेतकऱ्याला देणार असल्याची घोषणा युनिट हेड एस. रंगाप्रसाद यांनी केली.

राज्यातील बहुतांशी साखर कारखान्यांनी एकरकमी उसाचा दर जाहीर करून हंगामास सुरुवात केली आहे. काही कारखान्याकडून ऊसदराच्या घोषणेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यासह राज्यातील एकमेव दालमियाने साखर कारखान्याने तुटलेल्या उसाला एकरकमी नव्हे, तर उंच्चाकी ३३०० रुपयांचा पहिला हप्ता आणि हंगामा समाप्तीनंतर दुसरा हप्ता देण्याची घोषणा करून ऊसदराबाबत यंदाही दबदबा निर्माण केला आहे.

काही दिवसांपूर्वी दालमिया प्रशासनाला शेतकरी संघटनांनी ऊसदर जाहीर करण्याबाबत निवेदन दिले होती. त्यावेळी दालमिया प्रशासनाने ऊसदराबाबत सकारात्मक आणि चांगला ऊसदर देण्याचे आश्वासन संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिले होते.

त्याप्रमाणे दालमिया प्रशासनाने यंदा गाळपास आलेल्या उसाला विनाकपात ३३०० रुपयांचा पहिला हप्ता देण्याची घोषणा केली.

हंगाम समाप्तीनंतर साखर उताऱ्याचे निश्चित धोरण ठरल्यानंतर ऊस बिलाचा उर्वरित हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार असल्याचे आश्वासन युनिट हेड रंगाप्रसाद यांनी दिले.

अधिक वाचा: उसाचे वजन भरण्यासाठी व चांगल्या रिकव्हरीसाठी कशी कराल ऊस तोडणी; वाचा सविस्तर

टॅग्स :ऊससाखर कारखानेशेतीशेतकरीकोल्हापूर